देशातील जनतेच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेता केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तब्बल १६ प्रकारच्या ‘फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन’ (FDC) म्हणजेच मिश्र औषधांच्या उत्पादनावर, विक्रीवर आणि वितरणावर तात्काळ प्रभावाने पूर्ण बंदी घातली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा’ (Drugs and Cosmetics Act) च्या कलम २६ए अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत.
बंदी घालण्याचे कारण काय?
वैज्ञानिक पुनरावलोकनानंतर असे समोर आले आहे की, या औषधांच्या मिश्रणामध्ये कोणताही ठोस उपचारात्मक फायदा नाही. म्हणजेच ही औषधे आजार बरी करण्यासाठी फारशी प्रभावी तर नाहीतच, उलट त्यांच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण आढाव्याचा भाग आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, ‘ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्ड’ने (DTAB) एका तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. या समितीने क्लिनिकल डेटा आणि औषधांच्या परिणामांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर ही १६ मिश्र औषधे रुग्णांसाठी निरुपयोगी आणि हानिकारक असल्याचे सांगत त्यांना बाजारातून त्वरित हटवण्याची शिफारस केली.
कोणत्या प्रकारच्या औषधांवर परिणाम?
या बंदीमुळे त्वचाविकार (Dermatological), वेदनाशामक (Pain-relief), पोटदुखीवरील (Antispasmodic), मधुमेहविरोधी (Anti-diabetic) आणि प्रतिजैविक (Antibiotics) अशा विविध प्रकारच्या औषध श्रेणींवर परिणाम झाला आहे. यामध्ये काही कोरफड (Aloe Vera) युक्त स्किन-केअर उत्पादनांचाही समावेश आहे.
बंदी घालण्यात आलेल्या १६ औषधांची यादी
१. अॅसिटिल सॅलिसिलिक अॅसिड + इथोहेप्टाझिन२. कोरफड अर्क + अॅलँटोइन + अल्फा टोकोफेरोल अॅसिटेट + डी-पँथेनॉल + व्हिटॅमिन ए३. कोरफड अर्क + व्हिटॅमिन ई + डायमेथिकोन + ग्लिसरीन४. कोरफड + जोजोबा ऑइल + व्हिटॅमिन ई५. कोरफड + ऑरेंज ऑइल६. कोरफड + जोजोबा ऑइल + गव्हाचे तेल (Wheat Germ Oil) + टी ट्री ऑइल७. कोरफड + व्हिटॅमिन ई + हर्बल मिश्रण८. डायसायक्लोमाइन + पॅरासिटामॉल + क्लिडिनियम ब्रोमाइड९. डायसायक्लोमाइन + पॅरासिटामॉल + क्लिडिनियम ब्रोमाइड + क्लोर्डियाझेपॉक्साइड१०. ग्लाइक्लाझाइड + क्रोमियम पिकोलिनेट (Gliclazide + Chromium Picolinate)११. पॅरासिटामॉल + लिग्नोकेन (Paracetamol + Lignocaine)१२. अमोक्सिसिलिन + सेराटिओपेप्टिडेज + लॅक्टोबॅसिलस स्पोरोजेन्स१३. अमोक्सिसिलिन + क्लोक्सासिलिन + लॅक्टिक अॅसिड बॅसिलस + सेराटिओपेप्टिडेज१४. अमोक्सिसिलिन + सेराटिओपेप्टिडेज१५. सेफाड्रॉक्सिल + प्रोबेनेसिड (Cefadroxyl + Probenecid)१६. सेफुरॉक्सिम + सेराटिओपेप्टिडेज (Cefuroxime + Serratiopeptidase)जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी वरील घटकांचा समावेश असलेली औषधे वापरत असाल, तर ती घेणे त्वरित थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.