डीके शिवकुमार यांनी हातात संविधान घेऊन कर्नाटकचे 24 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 30 मे रोजी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिवकुमार यांची पक्षाचे नेते म्हणून निवड झाली होती. जी. परमेश्वर यांनी नवीन उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र आणि विधान परिषद सदस्य (एमएलसी) यतींद्र सिद्धरामय्या यांच्यासह इतर 14 आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.
शिवकुमार हे सिद्धरामय्या यांची जागा मुख्यमंत्री म्हणून घेतील. सिद्धरामय्या यांनी 28 मे रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.त्यांनी 20 मे 2023 ते 28 मे 2026 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. याव्यतिरिक्त, के. जी. जॉर्ज, एम. बी. पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जाखोली, कृष्णा बायरेगौडा, प्रियांक खर्गे, यू. टी. खेदर, ईश्वर खंड्रे, यतींद्र सिद्धरामय्या, बायराथी सुरेश आणि शरण प्रकाश पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.
डीके शिवकुमार यांचे प्राधान्यक्रम काय असतील?
पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही जबाबदारी डी. के. शिवकुमार यांच्याकडे सोपवण्यात आली. शिवकुमार यांनी राज्यकारभारासाठी आपले प्राधान्यक्रम स्पष्ट केले आहेत. त्यांनी सांगितले की, राज्यातील जनतेने त्यांच्यावर जो विश्वास आणि भरवसा दाखवला आहे, त्याबद्दल ते अत्यंत कृतज्ञ आहेत. त्यांनी सांगितले की, पुढील मार्ग सोपा नसेल आणि त्यात अनेक आव्हाने असतील. ते जनतेचा विश्वास सार्थ करत, परिश्रमपूर्वक आणि प्रामाणिकपणे काम करतील. त्यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारचे लक्ष सुशासन, विकास, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि गुंतवणूक आकर्षित करणे यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर असेल.
सलग 8 टर्म विजयी आणि 'जायंट किलर'
डी. के. शिवकुमार यांचा जन्म 15 मे 1962 रोजी रामनगर जिल्ह्यातील कनकपुरा येथे झाला. अत्यंत तरुण वयात, म्हणजेच वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी युथ काँग्रेसमधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1989 मध्ये त्यांनी कनकपुरा मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला 2004 ची निवडणूक. त्यांनी कर्नाटकाचे दिग्गज नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात निवडणूक लढवून सर्वांना चकित केले. या अत्यंत चुरशीच्या लढाईत शिवकुमार यांनी देवेगौडा यांच्यासारख्या महाकाय नेत्याला पराभूत करून 'जायंट किलर' अशी ओळख मिळवली. आजपर्यंत त्यांनी सलग 8 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली असून, त्यांना आपल्या कारकिर्दीत एकाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेला नाही.
वोक्कलिगा समाजाचे नेतृत्व आणि राजकीय प्रभाव
डी. के. शिवकुमार हे कर्नाटकातील अत्यंत प्रभावशाली अशा 'वोक्कलिगा' समाजातून येतात. कर्नाटकच्या राजकारणात 'लिंगायत' समाजानंतर वोक्कलिगा हा दुसरा सर्वात मोठा आणि निर्णायक मतदारसंघ मानला जातो. जुन्या म्हैसूर भागात या समाजाचा प्रचंड दबदबा आहे. पारंपारिकपणे वोक्कलिगा समाज हा एच. डी. देवेगौडा यांच्या जेडीएस (JDS) पक्षाचा पाठीराखा मानला जात होता. परंतु, डी. के. शिवकुमार यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे हा समाज मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे वळला. 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या ऐतिहासिक विजयामागे वोक्कलिगा मतांचे शिवकुमार यांनी केलेले ध्रुवीकरण हेच मुख्य कारण होते. आज ते या समाजाचे सर्वात मोठे आणि सर्वमान्य नेते म्हणून उदयास आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.