नवी दिल्ली : नीट पेपरफुटीसारख्या घोटाळ्याच्या संदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) माध्यमातून नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे.
यासाठी कॉक्रोच जनता पार्टी या सोशल मीडिया पेजचे संस्थापक अभिजीत दिपके हे स्वत: भारतात येणार आहेत. यासंदर्भात आता 'कॉक्रोच जनता पार्टी' ने आज (03 जून) आपल्या पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तीन प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त व्यक्तींमध्ये एका पत्रकाराचा, एका चित्रपट निर्मात्याचा आणि आयआयटीच्या माजी विद्यार्थ्याचा समावेश आहे. शिक्षण व्यवस्थेतील कथित घोटाळ्यांच्या विरोधात नियोजित असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपी आपल्या जनसंपर्काचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे.
अभिजीत दिपके यांनी स्थापन केलेल्या या संघटनेने 'X' (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर या नियुक्त्यांची घोषणा केली. या घोषणेनुसार, शोध पत्रकार सौरभ दास हे सीजेपीचे मुख्य प्रवक्ते म्हणून काम पाहतील. तर राजकीय संशोधक आणि चित्रपट निर्मात्या विजेता दहिया, तसेच आयआयटीचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका हे दोघेही जनतेसमोर आणि माध्यमांसमोर संघटनेची भूमिका मांडतील. सीजेपीने म्हटले आहे की, भारताच्या राजकीय संवादात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सीजेपी कटिबद्ध आहे आणि या चळवळीचे नेतृत्व नेत्यांची एक नवी पिढी करेल. सीजेपीच्या घोषणेनुसार सौरभ दास यांनी कायदेशीर, न्यायिक आणि सामाजिक मुद्द्यांवर सविस्तर पत्रकारिता केली आहे. तसेच, नोव्हेंबर 2025 मध्ये 'इंडिया गेट' येथे झालेल्या प्रदूषणविरोधी आंदोलनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.पक्षाने नमूद केले की, विजेता दहिया या राजकीय संशोधक, लेखिका आणि चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी अनेक 'यूट्यूब क्रिएटर्स'साठी संशोधन आणि आशय निर्मितीचे काम केले आहे. 'दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी' (DTU) च्या पदवीधर असलेल्या विजेता यांनी 'Power of Universe' आणि 'To Hell With That Job' या पुस्तकांचे लेखन केले आहे. तसेच, त्यांनी 'Dararen' आणि 'Opri Parai' या हरियाणवी चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. तर आयआयटी कानपूर आणि 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'चे माजी विद्यार्थी असलेले आशुतोष रांका यांनी यापूर्वी लंडन येथील 'मॅककिन्सी अँड कंपनी'मध्ये काम केले होते. सीजेपीने सांगितले की, आशुतोष रांका गेल्या वर्षी भारतात परतले. तेव्हापासून ते जयपूरमध्ये पर्यावरण, शिक्षण आणि युवा वर्गाशी संबंधित विविध सामाजिक मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. यामध्ये 'नीट' परीक्षेचा पेपर फुटल्याच्या वादाशी संबंधित मुद्द्यांचाही समावेश आहे.
अभिजीत दीपके 6 जून रोजी भारतात परतणार
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टी या सोशल मीडिया पेजचे संस्थापक अभिजीत दिपके हे 6 जून रोजी भारतात परतणार आहेत, याचपार्श्वभूमीवर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 'नीट' परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा कथित प्रकार आणि सीबीएसई कार्यप्रणालीतील त्रुटी या मुद्द्यांवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करण्याची योजना अभिजीत दीपके यांनी जाहीर केली आहे. गेल्या महिन्यात सुरू करण्यात आलेल्या 'सीजेपी' या उपक्रमाला समाजमाध्यमांवर विशेषतः विद्यार्थी आणि तरुणांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली आहे. तसेच शिक्षण आणि तरुणांशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणारे एक व्यासपीठ म्हणून या उपक्रमाने आपली ओळख निर्माण केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.