"ईडी-सीबीआयच्या भीतीने संघ ढेपाळला?" प्रकाश आंबेडकरांचा आक्रमक सवाल! "पंतप्रधान मोदींनी मोहन भागवतांना गुलाम केलंय!" या दाव्यानंतर राजकारणात भूकंप!
नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला लक्ष्य केले आहे. गुरुवारी नागपुरात पुन्हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुलाम झाल्याचे दिसत असल्याचे नमुद केले.
पंतप्रधानांच्या चारित्र्यावर जाहिर आरोप तरीही स्पष्टीकरण नाही
ॲड. प्रकाश आंबेडकर गुरुवारी नागपुरातील रवीभवनात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते. ते म्हणाले, लेखिका मधुकेश्वर, ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चारित्र्यावर जाहीररित्या शंका व्यक्त केली आहे. त्यांनी शंका व्यक्त केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या जाहीर आरोपाबाबत पंतप्रधानांना स्पष्टीकरण मागितले नाही. मोहन भागवत पंतप्रधानांना जाहिर आरोबाबत खुलासाही मागत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांना गुलाम केले आहे, असे मी मानतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
देशात प्रत्येक राजकीय माणूस आज गुलाम झाला आहे. विधानपरिषदेच्या नुकताच झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मतदान नव्हते तरीही शेवटपर्यंत लढले. परंतु कॉंग्रेसचे उमेदवार अर्ध्यावर पळून गेले किंवा लढलेच नाही. त्यामुळे राजकीय पक्ष गुलाम होत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे आंबेडकर म्हणाले.
जागतिक नेत्यांकडून पंतप्रधानांच्या कमजोरीचा फायदा
जगातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांना जे हवे आहे, ते करून घेतात आहे, अशी स्थिती आहे. पंतप्रधानांच्या कमजोरीचा फायदा घेऊन देशाचे शोषण करीत आहेत. देशात शेतकऱ्यांसाठी संविधानाने कृषी बाजार आरक्षित ठेवला होता, तो आता अमेरिकेसोबतच्या करारामुळे जगाला खुला होणार आहे. यासारख्या अनेक उदाहरणातून देशाचे आर्थिक संकट वाढत असून आता सामान्य माणसाने आवाज उठवायला सुरुवात केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. जगात देशाची पत घसरत असून देशाला आर्थिक गुलामगिरीकडे नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.
लोकांनी आता उठाव केला पाहिजे
राजकीय व्यवस्थेला लकवा मारला असेल तर लोकांनी पक्षाघात झाल्यासारखे वागणे योग्य नाही. लोकांनी या व्यवस्थेला प्रश्न विचारायला पाहिजे. खुर्ची खाली करण्याची मागणी केली पाहिजे वंचित बहुजन आघाडी सरकारचे अपयश, त्रुटी मांडत आहे, लोकांनी मात्र उठाव केला पाहिजे. विरोधी पक्ष हवा की नको, हे लोकांनी ठरवले पाहिजे. महाविकास आघाडीचे विसर्जन झाले आहे. प्रत्येकजण वैयक्तिकरित्या भाजपसोबत जात आहे.
संघ किंवा भाजपला देशप्रेम नाही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपला देशप्रेम नव्हते, नाही आणि राहणार नाही. त्यांना फक्त धर्म आणि धर्मातून येणारी सत्ता, यातच रस आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे १२ वर्षे सत्तेत राहूनही देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा कार्यक्रम नाही. परराष्ट्रीय धोरण नाही. उठसूठ मुस्लिमविरोधी भूमिका किंवा उत्सव साजरा हेच यांचे काम आहे, अशी टिका त्यांनी केली.
धर्माने पोट भरत नाही
इराणबरोबर आपले संबंध चांगले होते. काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे, ही त्यांनी भूमिका घेतली होती. एक मुस्लिम राष्ट्र मित्र होता. इराणने सहा सहा महिने कच्चे तेल उधारीवर दिले. व्याजही लावले नाही, अशा मित्राच्या पाठीमागे सरकार उभे राहिले नाही. देशाचा एजेंडा नुसता धार्मिक झाला आहे. धर्माने पोट भरत नाही, असे ते म्हणाले.
दीपकेंचे आंदोलन अपयशी ठरण्याची भीती
अभिजित दीपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीची सुरुवात केली, त्यावेळी त्यांना समाजमाध्यमावर दोन कोटींवर फालोअर मिळाले. परंतु दीपके शुद्र आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांचा दिल्लीतील मोर्चा लाखाचाही होऊ शकला नाही. तरुण पिढी सुद्धा स्वत:च्या प्रश्नाला महत्त्व देण्यापेक्षा कोण कुठल्या जातीचा आहे, हे बघून पाठीमागे जायचे ठरवत असेल हे भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे. त्यामुळे कॉक्रोचचे एवढे मोठे आंदोलन अपयशी ठरते का, अशी भीती वाटत आहे, असे ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.