Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील गुन्हेगारी कठोरपणे मोडून काढाआमदार सुधीरदादा गाडगीळ; जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट

सांगलीतील गुन्हेगारी कठोरपणे मोडून काढा आमदार सुधीरदादा गाडगीळ; जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट 

सांगली:- सांगली शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी कठोरपणे मोडून काढा. नागरिकांना दिलासा द्या, अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज केली. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार  दोशी यांची भेट घेऊन त्यांनी सांगलीतील कायदा सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच वेदांत बंडगर याच्या निर्दय हत्येबद्दल गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असेही मत व्यक्त केले.  

आमदार गाडगीळ यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी आमदार गाडगीळ म्हणाले, सांगली पोलीस दलाचा लौकिक चांगला आहे. त्या लौकिकाला साजेसे काम यापुढे घडले पाहिजे. वेदांत बंडगर  याच्यासारख्या निष्पाप मुलाची हत्या सर्वांनाच धक्का देणारी आणि वेदना देणारी आहे. या हत्या प्रकरणाची पाळेमुळे पोलिसांनी खणून काढावीत. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. सराईत गुन्हेगार मोकाट सुटता कामा नये. जामिनावर सुटून अशा गुन्हेगारांनी गुन्हेगारी कारवाया करू नयेत याकडे पोलिसांनी दक्षतेने लक्ष द्यावे. 

आमदार गाडगीळ म्हणाले, नागरिकांच्या जीवित आणि वित्ताची सुरक्षा हे पोलिसांचे प्रमुख काम आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलिसांना फ्रीहँड दिला आहे. गृहमंत्री आणि पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधी यांचा पोलिसांच्या कामात कोणताही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणि गुन्हेगारांना कायद्याचा बडगा दाखवून वठणीवर आणावे. बिलकुल दयामाया दाखवू नये.

आमदार गाडगीळ यांनी स्पष्ट केले की पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वेदांत बंडगर यांच्या खून प्रकरणातील दोषी गुन्हेगारांना मोका लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता कोणाचाही मुलाहिजा न ठेवता गुन्हेगारी मोडून काढण्याची मोहीम सुरू करावी. जे पोलीस अधिकारी आणि पोलीस नागरिकांच्या जीवित आणि वित्ताचे संरक्षण करण्याच्या बाबतीत चालढकल करतील त्यांच्यावरही तातडीने कारवाई करावी अशीही मागणी आमदार गाडगीळ यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.