नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलेल्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे. नीट पेपरफुटी आणि सीबीएसई पुनर्मूल्यांकन प्रकरणांमुळे वादात सापडलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला देशद्रोही म्हटले आहे. सीजेपी ही विघटनकारी घटकांची ‘बी-टीम’ असल्याचा आरोप प्रधान यांनी केला. ‘ज्यांना लोकशाहीत जनतेने नाकारले, ते आता वेष बदलून आले असून व्यवस्थेला लक्ष्य करत आहेत’, असे ते म्हणाले. देशभरातील २२ लाखांहून अधिक उमेदवारांसाठी कडक लष्करी आणि पोलिस बंदोबस्तात नीटची पुनर्परीक्षा घेण्यात आली, जी शिक्षणमंत्र्यांनी पूर्णपणे यशस्वी आणि पारदर्शक असल्याचे म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्र्यांनी आंदोलकांवर कडाडून टीका केली. त्यांनी विरोधी पक्ष काँग्रेसलाही निशाण्यावर घेतले. धर्मेंद्र प्रधान यांनी आरोप केला की, राहुल गांधी नीट विवादाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना घाबरवत आहेत आणि देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करू इच्छितात. दरम्यान, जे लोक प्रदीर्घ काळ सत्तेत होते, त्यांनी केवळ जनतेचे शोषण केले आणि आता ते ‘ए’ किंवा ‘बी’ टीमच्या माध्यमातून देशाला बदनाम करण्याचे राजकारण करत आहेत, जे जनता चांगल्याप्रकारे ओळखून आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सीजेपीचे डायपर ड्राईव्ह
नीट पेपर लीकप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपी गेल्या चार दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सलग निदर्शने करत आहे. सीजेपीने मंगळवारी आपल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी एका अनोख्या ‘डायपर डोनेशन ड्राईव्ह’ची घोषणा केली. सीजेपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली.
आंदोलनादरम्यान दिपकेंना झाली होती मारहाण
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये त्यांच्या आंदोलनादरम्यान मारहाण झाल्याची माहिती आहे. अभिजित दीपके रविवारी रात्री उशिरा जयपूरमध्ये दाखल झाले होते. जयपूर येथील शासकीय वसतिगृहात असलेल्या शहीद स्मारकाजवळ मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काही अज्ञातांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.