Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड. लोकसभा अध्यक्षांचे ठाकरे गटाला भेटीसाठी आमंत्रण.

दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड. लोकसभा अध्यक्षांचे ठाकरे गटाला भेटीसाठी आमंत्रण.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडली. सहा खासदारांनी त्यांची साथ सोडली आणि स्वतंत्र गट करत त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज दिल्लीत मोठी घडामोड घडत आहे.

ठाकरे सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत आणि मुख्य प्रतोद अनिल देसाई यांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावणे पाठवले आहे. हे दोघेही लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. फुटीर खासदारांच्या गटाला परवानगी न देण्याची विनती ठाकरे गटाने केली होती. याविषयीचे पत्र ज्या दिवशी व्हीप बजावून उद्धव सेनेचे बैठक बोलावण्यात आली होती, त्याच दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आले होते. त्यानंतर सहाही खासदारांनी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला भेटीसाठी  बोलावले आहे. या भेटीतून काय समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे.

फुटीर गटासमोर अडचणींचा डोंगर?

ऑपरेशन टायगरची राज्यात जोरदार चर्चा सुरू होती. शिंदे सेनेच्या दाव्यानुसार, त्यांनी फुलप्रुफ ऑपरेशन टायगर राबवले सुद्धा. तर ठाकरे गटाने या ऑपरेशनची दखल घेत, लोकसभा अध्यक्षांना फुटीर गटाला मान्यता देण्याच्या अगोदर आमची बाजू ऐकून घेण्याची विनंती केली होती. त्यासाठी खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील पक्षाने बोलावलेल्या बैठकीनंतर लागलीच लोकसभा अध्यक्षांचे दालन गाठले होते. त्यांनी फुटीर गटाला मान्यता न देण्याचे पत्र दिले होते.

एक दिवसापूर्वी सहा फुटीर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरे सेनेला भेटीसाठी बोलावले आहे. लोकसभेतील ठाकरे सेनेचे गटनेते अरविंद सावंत आणि मुख्य प्रतोद अनिल देसाई यांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावले आहे. सायंकाळी पाच वाजता या दोघांना भेटीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आज नेमकं काय होतं? उद्धव ठाकरे गट काय बाजू मांडते आणि त्यावर लोकसभा अध्यक्ष काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी परिशिष्ट 10 आधारे कोणतीही मान्यता देऊ नये अशा प्रकारची मागणी या खासदारांनी अगोदरच केलेली आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे तीन सदस्यीय शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली होती. पण त्यांच्या भेटीचे फोटो आणि त्यांनी दिलेले पत्र अद्यापही समोर आलेले नाही, त्यामुळे अजून एक सस्पेन्स वाढल्याचे चित्र आहे. आता ठाकरेंच्या या कॅव्हेटवर लोकसभा अध्यक्षांची भूमिका काय असेल. फुटीर गटाच्या अडचणी वाढतील की ठाकरे गटाला मोठा धक्का बसेल हे चित्र संध्याकाळी स्पष्ट होईल. या सर्व घडामोडींवर अद्याप शिंदे गोटातून प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.