Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता महाराष्ट्रात खासगी रुग्णालयांना कडक आदेश: प्रत्येक बालमृत्यूची नोंद २४ तासांत करणे सक्तीचे

आता महाराष्ट्रात खासगी रुग्णालयांना कडक आदेश: प्रत्येक बालमृत्यूची नोंद २४ तासांत करणे सक्तीचे


मुंबई : राज्यातील बालमृत्यूची आकडेवारी अचूक उपलब्ध झाल्यास प्रभावी उपाययोजन करणे शक्य होणार आहे, ही बाब लक्षात घेत राज्य सरकारने राज्यातील सर्व खासगी रुग्णालये, प्रसूतिगृहे, बालरुग्णालये, तसेच इतर खासगी आरोग्य संस्थांना बालमृत्यूबाबतची नोंद नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस) व आरोग्य व्यवस्थापन माहिती पध्दती (एचएमआयएस) या प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, प्रत्येक बालमृत्यूची माहिती २४ तासांच्या आत स्थानिक सार्वजनिक आरोग्य संस्थेला विहित नमुन्यात कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शाश्वत विकास ध्येयानुसार भारत सरकारने २०३० पर्यंत बालमृत्यूदर प्रत्येक एक हजार जिवंत जन्मामागे २५ पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्राने हे उद्दिष्ट साध्य केले असून, बालमृत्यूदर प्रत्येक १००० जन्मामागे १६ पर्यंत कमी केलेला आहे. मात्र, सरकारी रुग्णालयांमधून बालमृत्यूंच्या अचूक नोंदी केल्या जात असल्या तरी खासगी रुग्णालयांमध्ये नोंदी अपुऱ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मृत्यू आणि नोंदविलेल्या मृत्यूंच्या आकडेवारीत तफावत निर्माण होत आहे. ही तफावत कमी व्हावी यासाठी राज्य सरकारने खासगी रुग्णालयांना बालमृत्युंची नोंद नागरी नोंदणी प्रणाली व आरोग्य व्यवस्थापन माहिती पध्दती या प्रणालीवर करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या आदेशानुसार राज्यातील सर्व खासगी प्रसूतिगृहे, मॅटर्निटी होम, बाल रुग्णालये, मल्टी स्पेशालिटी रुग्णालये, अशासकीय रुग्णालये आणि ज्या सर्व खाजगी आरोग्य संस्थांमध्ये बालमृत्यू होतात, त्यांना हे नियम लागू राहणार आहेत. या संस्थांनी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालमृत्यूची माहिती विहित नमुन्यात स्थानिक सार्वजनिक आरोग्य संस्थेला २४ तासांच्या आत देणे बंधनकारक राहील.



एचएमआयएसमध्ये नोंद कशी करणार
खासगी रुग्णालयांचे एचएमआयएस प्रणालीमध्ये मॅपिंग झालेले नाही, त्यांनी संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक किंवा महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडून मॅपिंग करून घ्यावे. तसेच सार्वजनिक आरोग्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील खासगी रुग्णालयांमध्ये झालेल्या बालमृत्यूंची माहिती दरमहा जिल्हास्तरावर सादर करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. तसेच एचएमआयएस प्रणालीवर सर्व नोंदी अचूकपणे झाल्या आहेत की नाही याची खात्री करण्याची जबाबदारीही सरकारी रुग्णालयांवर सोपविण्यात आली आहे.
सरकारी रुग्णालयांवर प्रशिक्षणाची जबाबदारी

एचएमआयएस प्रणालीबाबत स्थानिक सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व खासगी रुग्णालयांना नियमित प्रशिक्षण देण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. राज्य आणि जिल्हा आरोग्य कार्यालयांचे अधिकृत ई-मेल आयडी सर्व खाजगी आरोग्य संस्थांना उपलब्ध करून देण्याचेही आदेश देण्यात आहेत.

कोठे होते नोंदणी
उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा स्त्री रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय रुग्णालये तसेच महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य संस्था-नगरपालिका, महानगरपालिका दवाखाने, वैद्यकिय महाविद्यालये व रुग्णालये या सर्व आरोग्य संस्थांमध्ये बालमृत्यू रजिस्टरमध्ये नोंदी करण्यात येतात व महिन्याअखेर या सर्व आरोग्य संस्थांमार्फत एचएमआयएस प्रणालीमध्ये होतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.