पोटात गॅस झाला, छातीत जळजळ झाली किंवा अॅसिडिटीचा त्रास सुरू झाला की अनेक जण क्षणाचाही विचार न करता थेट गॅसची गोळी घेतात. काही लोक तर या गोळ्या कायम खिशात किंवा पर्समध्ये ठेवतात. पण, हीच सवय तुमच्या शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवत असेल तर? एका प्रसिद्ध डॉक्टरांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता या सवयीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं स्पष्ट होत आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात अयोग्य आहार, ताणतणाव आणि अनियमित दिनचर्येमुळे गॅस, अॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्या सामान्य झाल्या आहेत, त्यामुळे अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमधून अँटासिड गोळ्या घेऊन वारंवार सेवन करतात. मात्र, तात्पुरता आराम देणाऱ्या या गोळ्या दीर्घकाळ स्वतःहून घेत राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा दिल्लीतील AIIMSच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि ह्यूमन न्यूट्रिशन विभागाचे प्राध्यापक डॉ. शालीमार यांनी दिला आहे.डॉ. शालीमार यांच्या मते, त्यांच्या विभागात अनेक असे रुग्ण येतात, ज्यांनी अनेक महिने किंवा वर्षानुवर्षे डॉक्टरांचा सल्ला न घेता गॅस आणि अॅसिडिटीच्या गोळ्यांचे सेवन केलेले असते. सुरुवातीला साधा वाटणारा हा उपाय नंतर शरीरासाठी मोठी समस्या ठरू शकतो, त्यामुळे कोणतीही औषधे निरुपद्रवी आहेत, असा समज करून ती वारंवार घेणे योग्य नाही.
हाडांवर होऊ शकतो परिणाम
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, काही प्रकारच्या अँटासिड औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यास शरीरातील कॅल्शियम आणि इतर महत्त्वाच्या पोषक घटकांच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हाडांची घनता कमी होण्याची शक्यता निर्माण होते.
यामुळे हाडे हळूहळू कमकुवत होऊ शकतात आणि किरकोळ धक्का लागला तरी फ्रॅक्चरचा धोका वाढू शकतो. ज्यांना आधीपासूनच हाडांशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
फुप्फुसांवरही होऊ शकतो परिणाम
डॉ. शालीमार यांच्या माहितीनुसार, काही अँटासिड औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यास काही व्यक्तींमध्ये फुप्फुसांशी संबंधित संसर्गाचा धोका वाढू शकतो. विशेषतः न्यूमोनियासारख्या संसर्गाची शक्यता वाढू शकते. न्यूमोनिया हा गंभीर संसर्ग मानला जातो. योग्य वेळी उपचार न झाल्यास रुग्णाची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे अशा औषधांचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि ठराविक कालावधीसाठीच करावा.
प्रत्येक वेळी गोळी हा उपाय नाही
गॅस किंवा अॅसिडिटी झाली की गोळी घेणे हा अनेकांचा पहिला पर्याय असतो. मात्र, वारंवार अशी समस्या होत असेल तर त्यामागे चुकीचा आहार, पोटाशी संबंधित आजार, ताणतणाव किंवा इतर वैद्यकीय कारणे असू शकतात. केवळ लक्षणे दाबण्यापेक्षा त्यामागचे मूळ कारण शोधणे अधिक महत्त्वाचे आहे.
गॅस आणि अॅसिडिटी टाळण्यासाठी काय कराल?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते काही साध्या सवयी अंगीकारल्यास गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.जास्त वेळ उपाशी राहू नका आणि थोड्या-थोड्या वेळाने हलका आहार घ्या.तळलेले, तेलकट, अतितिखट आणि फास्ट फूडचे सेवन कमी करा.मद्यपान टाळण्याचा प्रयत्न करा.दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा.पुरेसे पाणी प्या.रात्रीची झोप पूर्ण घ्या आणि ताणतणाव कमी ठेवा.डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्लाडॉ. शालीमार सांगतात की, ‘गॅस, अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ वारंवार होत असेल तर स्वतःहून सतत औषधे घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे. योग्य तपासणीनंतरच आजाराचे खरे कारण समजू शकते आणि त्यानुसार उपचार करता येतात, त्यामुळे अशा समस्यांकडे दुर्लक्ष करू नका आणि औषधे स्वतःच्या मनाने दीर्घकाळ घेणे टाळा.’आरोग्याच्या बाबतीत छोटा वाटणारा निष्काळजीपणा भविष्यात मोठी समस्या ठरू शकतो, त्यामुळे गॅसची गोळी ही कायमची सवय बनवण्याऐवजी तिची गरज का निर्माण होते हे समजून घेणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.