Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'ब्लूटूथ'वर गप्पांच्या नादात घात! निष्पाप रुग्णाला टोचले भलतेच इंजेक्शन; निर्दयी नर्सच्या हलगर्जीपणाने घेतला जीव!

'ब्लूटूथ'वर गप्पांच्या नादात घात! निष्पाप रुग्णाला टोचले भलतेच इंजेक्शन; निर्दयी नर्सच्या हलगर्जीपणाने घेतला जीव!


रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना आणि नर्सना देवाचे रूप मानले जाते. मात्र, याच व्यवस्थेतील एका कर्मचाऱ्याच्या मोबाईलच्या व्यसनामुळे आणि अक्षम्य हलगर्जीपणामुळे एका निष्पाप रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सागर येथील बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. ड्युटीवर असताना कानात ब्लूटूथ इयरफोन लावून फोनवर बोलण्यात व्यस्त असलेल्या एका नर्सने रुग्णाला चुकीच्या वेळी अत्यंत हाय-रिस्क इंजेक्शन दिले. 
या हलगर्जीपणामुळे रुग्णाची प्रकृती खालावली आणि अखेर ११ दिवसांच्या मृत्यूपंथावरील संघर्षानंतर त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. देवेंद्र पाठक असे मृत दुर्दैवी रुग्णाचे नाव आहे. देवेंद्र यांच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रुग्णालयात जोरदार गोंधळ घालत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी मृत देवेंद्र यांच्या पत्नी रीता पाठक यांनी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे.
मज्जाव करूनही नर्स फोनवरच व्यस्त होती!

रीता पाठक यांनी तक्रारीत आरोप केला आहे की, "जेव्हा नर्स देवेंद्र यांना इंजेक्शन देण्यासाठी आली, तेव्हा तिच्या कानात ब्लूटूथ इयरफोन लागलेले होते आणि ती फोनवर कोणाशी तरी बोलण्यात मग्न होती. आम्ही तिला फोनवर बोलणे बंद करून आधी नीट इंजेक्शन देण्यास सांगितले, तिला वारंवार टोकले, पण तिने आमच्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि फोनवर बोलत बोलतच इंजेक्शन टोचले."

ऑपरेशनपूर्वी द्यायचे इंजेक्शन आधीच दिले!
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र पाठक यांना गळ्यात गाठ आल्यामुळे आणि बायोप्सीच्या तपासणीसाठी १२ जून रोजी बुंदेलखंड मेडिकल कॉलेजच्या ईएनटी विभागात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्या पुढील उपचारासाठी 'एट्रॅक्युरीअम बेसिलेट' नावाचे इंजेक्शन मागवले होते. हे एक अत्यंत हाय-रिस्क औषध मानले जाते, ज्याचा वापर शस्त्रक्रियेदरम्यान स्नायू शिथिल करण्यासाठी आणि रुग्णाला भूल देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली केला जातो. परंतु, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने हे अत्यंत संवेदनशील इंजेक्शन डॉक्टरांच्या परवानगीशिवाय आणि कोणतीही खातरजमा न करता वॉर्डमध्येच देवेंद्र यांना देऊन टाकले, जे खरं तर दुसऱ्या दिवशी ऑपरेशनच्या वेळी देणे गरजेचे होते.
इंजेक्शन देताच श्वास कोंडला, ११ दिवसांनी मृत्यू!

हे हाय-रिस्क इंजेक्शन शरीरात जाताच देवेंद्र पाठक यांची प्रकृती झपाट्याने खालावली. त्यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. देवेंद्र यांची अवस्था पाहून नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यावर डॉक्टरांनी धाव घेतली. डॉक्टरांनी तब्बल ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि प्रकृती गंभीर असल्याने व्हेंटिलेटरवर घेतले. तब्बल ११ दिवस देवेंद्र हे मृत्यूशी झुंज देत होते, मात्र २३ जूनच्या सकाळी त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पाठक कुटुंबाचा मुख्य आधार हरपला असून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नर्स शिखा पटले निलंबित!
हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि प्राथमिक तपासानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित नर्स शिखा पटले हिला निलंबित केले आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मात्र, या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, इतके हाय-अलर्ट औषध वॉर्डपर्यंत पोहोचले कसे? नियमांनुसार अशा औषधांच्या वापरापूर्वी डबल-चेकिंग करणे बंधनकारक असताना ते का केले गेले नाही? सध्या पोलीस आणि मेडिकल कॉलेज प्रशासन या दोन्ही पातळीवर या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.