Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईच्या भायखळात घातपाताचा भयंकर कट उधळला! मोहरम जुलूसमध्ये विषारी कॅप्सुल वाटणारा पुण्याचा तरुण जेरबंद!

मुंबईच्या भायखळात घातपाताचा भयंकर कट उधळला! मोहरम जुलूसमध्ये विषारी कॅप्सुल वाटणारा पुण्याचा तरुण जेरबंद!


मुंबई : भायखळा परिसरात शुक्रवारी निघालेल्या मोहरमच्या मिरवणुकीत (जुलूस) घातपात घडवून आणण्याचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला. झिंक फॉस्फाइड हे उंदीर मारण्याचे विष मिसळलेल्या कॅप्सुल पेनकिलर म्हणून वितरित करण्यात आल्या. पोलिसांनी असे विषारी कॅप्सुल वितरित करणाऱ्या फय्याज प्रेमजी (३९) याला ताब्यात घेत त्याच्याकडून १४,९०० कॅप्सुल जप्त केल्या आहेत. हा 'लोन वुल्फ' हल्ल्याचा प्रकार होता का? या दिशेनेही पोलीस तपास करत आहे. मूळचा पुण्याचा रहिवासी असलेला फय्याज १५ दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. डोंगरीतील एका हॉटेलमध्ये तो थांबला होता.

नेमके काय घडले मिरवणुकीत?

शुक्रवारी भायखळा, अंजीरवाडी, सीताफळवाडी मार्गाने मोहरमची मिरवणूक निघाली होती. फय्याज या मिरवणुकीत कुठलीही परवानगी न घेता मोफत कॅप्सुल वाटत होता. हे औषध वेदनाशामक असल्याचे तो सांगत होता. मात्र, सलमान सय्यद नामक व्यक्तीने गोळी घेतल्यावर त्याला उलट्या सुरू झाल्या. या प्रकाराने संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गोळ्या वाटणाऱ्या फय्याजला ताब्यात घेतले. सर्वांना कॅप्सुल न खाण्याच्या तसेच त्या पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. वेळेवर उपचार मिळाल्याने सलमानची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या तक्रारीवरून भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंदीर मारण्याचे विष टाकले, फय्याजची कबुली
कॅप्सूलमध्ये राखाडी रंगाची आयुर्वेदिक पावडर असल्याचा दावा करत, ही कॅप्सूल खाल्ल्याने दुखणे कमी होते, असा दावा फय्याजने पोलिसांकडे केला. सुरुवातीला त्याची माहिती घेत पोलिसांनी त्याला सोडून दिले. कॅप्सूलचे नमुने चाचणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवले. सलमानला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास झाल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला. पहाटे चार वाजता सलमानने खाल्लेल्या कॅप्सुलबाबत संशय निर्माण होताच पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे फय्याजला ताब्यात घेतले. फय्याजने जुलूसला टार्गेट करण्यासाठी कॅप्सुलमध्ये उंदीर मारण्याचे विष टाकल्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.