सांगली हादरली! दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळली; ओढणीने पाय बांधले, छातीवर बसून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने आवळला गळा!
सांगली :- पतीकडून सतत दारूच्या नशेत होणारी मारहाण आणि शिवीगाळीचा भयंकर शेवट झाला आहे. रोजच्या छळाला कंटाळून पत्नीने आपल्या २३ वर्षीय प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून क्रूरपणे खून केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. आनंद हणमंत सर्जे (वय २८, रा. पोळ मळा, १०० फुटी रोड, सांगली) असे मृत दुर्दैवी पतीचे नाव आहे. याप्रकरणी सांगली पोलिसांनी संशयित पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
हसत्या-खेळत्या संसाराचा रक्तरंजित शेवट!
मृत आनंद सर्जे यांचा प्रेमविवाह झाला होता, त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र, दारूच्या व्यसनामुळे गेल्या काही दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. गुरुवारी पहाटे त्यांच्यात पुन्हा किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. पतीच्या रोजच्या अमानुष त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने अखेर टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले आणि आपल्या प्रियकराला तात्काळ घरी बोलावून घेतले.
ओढणीने पाय बांधले, छातीवर बसून आवळला गळा!
प्रियकर घरी येताच दोघांनी मिळून आनंद सर्जे यांना गाठले. सुरुवातीला एका ओढणीच्या साहाय्याने आनंद यांचे पाय घट्ट बांधण्यात आले, जेणेकरून त्यांना प्रतिकार करता येऊ नये. यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने थेट आनंद यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा आवळला आणि त्यांचा जीव घेतला.
नैसर्गिक मृत्यूचा कांगावा फसला, पोलिसांसमोर पोपट बोलला!
क्रूरपणे खून केल्यानंतर दोघांनीही आनंद यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचा कांगावा केला. हा मृत्यू नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न करत त्यांना पहाटेच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांना आनंद यांच्या गळ्यावर संशयास्पद ओरखडे आढळून आले. अखेर उत्तरीय तपासणीत त्यांचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले.यानंतर पोलिसांनी संशयाच्या सुईवरून पत्नीला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच ती गडबडली. तिच्या चेहऱ्यावरील भीती आणि बदललेल्या वर्तणुकीमुळे पोलिसांचा संशय बळावला. कसून चौकशी करताच तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक कबुली दिली. या घटनेमुळे सांगली शहरात तीव्र खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.