Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"खाकी वर्दी उतरवा अन् भाजपमध्ये जा!" :, राज ठाकरेंचा थेट आयपीएस विश्वास नांगरे पाटलांवर घणाघात

"खाकी वर्दी उतरवा अन् भाजपमध्ये जा!" :,  राज ठाकरेंचा थेट आयपीएस विश्वास नांगरे पाटलांवर घणाघात


मुंबई: आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या संस्थापकांची स्तुती केल्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका पोस्टद्वारे राज यांनी पोलिस अधिकाऱ्याने निष्पक्ष राहणे गरजेचे असल्याचे सांगत, संघाशी निष्ठा असेल तर सेवेतून बाहेर पडून भाजप किंवा संघात सामील व्हावे, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

अधिकाऱ्याची निष्ठा फक्त कर्तव्याशी
राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, विश्वास नांगरे पाटील हे सरकारी सेवेतील अधिकारी असल्याने त्यांची निष्ठा केवळ पोलीस दलाच्या कर्तव्याशी असावी. मात्र, सध्या राज्यात भरवल्या जाणाऱ्या हिंदू संमेलनांपैकी एका कार्यक्रमात ते गेले आणि तेथे संघाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ही संमेलने अराजकीय असल्याचे भासवले जात असले तरी ती राजकीय स्वरूपाचीच आहेत, असे राज यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे आयोजक कोण आहेत आणि त्यामागील हेतू काय आहेत, याचा विचार केल्यास अनेक गोष्टी स्पष्ट होतात, असेही त्यांनी सांगितले.

पोलिस अधिकारी म्हणून निष्पक्षता ही मूलभूत अपेक्षा आहे. मात्र, अशा कार्यक्रमात सहभागी होऊन संघाची स्तुती करताना नांगरे पाटील यांना ही जबाबदारी विसरल्याचे दिसते, अशी टीका राज यांनी केली. संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवावी किंवा जाहीरपणे बोलायचे असेल तर प्रथम सेवेचा राजीनामा द्यावा आणि थेट संघ अथवा भाजपमध्ये सामील व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला. सध्या मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसनाची व्यवस्था उपलब्ध असल्याचेही राज यांनी अधोरेखित केले.

खाकी वर्दी आणि निष्ठेचा प्रश्न

नांगरे पाटील यांच्या खाकी वर्दीचा उल्लेख करताना राज ठाकरे म्हणाले की, तो रंग पोलीस दलाचा समजला जातो, मात्र तो संघाच्या खाकीशी संबंधित असल्याचे आता कळाले. ते स्वतः भरकटले असतील, परंतु अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते का, असा प्रश्न उपस्थित केला. उद्या सत्ता गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला अधिकारी गेला तर त्यावेळी आक्षेप घेतला जाणार नाही ना, याकडेही लक्ष वेधले.

भूतकाळातील उदाहरण आणि चूक पायंडा
२०१२ मध्ये रझा अकादमीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्चात एका कॉन्स्टेबलने पोलिसांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्यावेळी तत्कालीन सरकारने निष्पक्षतेचा भंग झाल्याचे सांगत त्या कॉन्स्टेबलला सक्तीची रजा दिली होती. आता नांगरे पाटील यांच्या बाबतीत सरकार हीच भूमिका घेणार का, की दुहेरी निष्ठा चालवली जाते, असा थेट सवाल राज यांनी केला.

सरकार गप्प बसून समर्थन करत असेल तर भविष्यातील पिढ्यांसमोर काय उदाहरण ठेवले जाते, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार-खासदारांना 'आमच्याकडे या' म्हणाल्यावर पळत जावे लागते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यात सरकारी अधिकारीही निष्पक्ष राहिले नाहीत तर जनतेला कोणाकडे पाहावे लागेल, असा प्रश्न उपस्थित केला.
कार्यक्षम अधिकाऱ्यांना विनंती

राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांना कार्यक्षम अधिकारी म्हणून संबोधित करत, त्यांची सद्सद्विवेकबुद्धी राजकीय पक्ष किंवा संघटनांसमोर गहाण टाकू नये, असे सांगितले. सरकारला असे समर्थन हवे असले तरी अधिकारी म्हणून स्वतंत्र आणि निष्पक्ष भूमिका बाळगणे महत्त्वाचे आहे. ही घटना केवळ एका अधिकाऱ्याची नसून, सरकारी यंत्रणेच्या निष्पक्षतेच्या विश्वासार्हतेशी संबंधित आहे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.