मिरज :- इन्शुरन्स, पीयूसी आणि रोड टॅक्स बुडवून शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्या दोन संशयितांना मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १०,००,०१०/- रुपये किमतीचा एक आयशर टेम्पो आणि बनावट नंबरप्लेट जप्त केली आहे. आयुब शमशुद्दीन गोलंदाज आणि फिरोज आयुब गोलंदाज (दोन्ही रा. भारतनगर, १०० फुटी रोड, मरगुचाई मंदिराजवळ, मिरज) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते.
दिनांक २० जून २०२६ रोजी पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर व पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर हे परिसरात गस्त घालत असताना, त्यांना भारतनगर परिसरात नंबरप्लेटवर खाडाखोड केलेला एक संशयास्पद आयशर टेम्पो जाताना दिसला. पोलिसांनी तातडीने पाठलाग करून टेम्पो थांबवला. चालक फिरोज गोलंदाज याच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
ई-चलन मशीनमुळे भांडे फुटले
पोलिसांनी समयसूचकता दाखवत एम.व्ही. ॲक्ट ई-चलन मशीनवर वाहनाचा तपशील तपासला. तेव्हा इंजिन नंबर आणि चेसिस नंबरमध्ये मोठी तफावत आढळून आली. पोलिसांनी चालकाला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, वाहनाचा मालक आयुब गोलंदाज याने हा टेम्पो विकत घेतला होता, मात्र त्याचे इन्शुरन्स, पीयूसी आणि फिटनेस सर्टिफिकेट मुदतबाह्य झाले होते. रोड टॅक्स आणि इन्शुरन्सचे पैसे वाचवून शासनाची फसवणूक करण्यासाठी त्यांनी दुसऱ्या एका आयशर टेम्पोची (MH-10-EJ-7866) बनावट नंबरप्लेट या वाहनावर लावली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर करत आहेत.सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कुंभार, राहुल क्षीरसागर, सर्जेराव पवार, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर, सुनील माने, चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल हणमंत कोळेकर यांनी केली.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
"अशा प्रकारे विविध क्लुप्त्या वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर सांगली पोलीस दल कठोर कारवाई करत आहे. नागरिकांना अशी कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ 'डायल ११२' वर संपर्क साधून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.