Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपमध्ये 'ब्राह्मण व्हर्सेस मराठा' वाद पेटला! अभिमन्यू पवारांच्या विधानानंतर मेधा कुलकर्णींचा संताप, बैठक सोडून तरातरा निघून गेल्या!

भाजपमध्ये 'ब्राह्मण व्हर्सेस मराठा' वाद पेटला! अभिमन्यू पवारांच्या विधानानंतर मेधा कुलकर्णींचा संताप, बैठक सोडून तरातरा निघून गेल्या!


पुण्यात सारथी संस्थेच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांमध्ये मराठा-ब्राह्मण वाद उफाळून आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मानापमान नाटय़ घडले. आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी खुर्ची सोडून तरातरा निघून गेल्या.

सारथी संस्थेच्या वतीने यूपीएससी आणि एमपीएससीमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे करण्यात केले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सारथी संस्थेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये पहिल्या रांगेत बसण्यावरून जोरदार वाद झाला. त्यावर मी जातीचा विषय किंवा वाद काढलाच नाही, असा खुलासा अभिमन्यू पवार यांनी केला आहे.

मेधा कुलकर्णी यांचा गैरसमज झाला आहे. नरेंद्र पाटील पुढे बसतील असे मी त्यांना म्हणालो. कारण ते अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघे मागे बसू, असे मी त्यांना सांगितलं. यात कोणत्याही जातीचा विषय किंवा वाद नव्हता. – अभिमन्यू पवार

नरेंद्र पाटील पुढे बसतील असं मीच सांगितले होते. पण, अभिमन्यू पवार यांना स्वतःला पुढे बसायचे होते. पवार यांच्या म्हणण्यानुसार हा मराठय़ांचा कार्यक्रम आहे आणि ब्राह्मण बसल्याने वाद होणार असेल तर तिथून निघून जाणेच योग्य ठरेल म्हणून मी कार्यक्रमातून बाहेर पडले. – मेधा कुलकर्णी
पवार नेमके काय बोलले

पुढच्या रांगेत खुर्च्या रिकाम्या असतील तर प्रोटोकॉलनुसार तुम्ही पुढे बसा असे सारथीच्या अधिकाऱ्यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांना सांगितले. कुलकर्णी खुर्चीवर बसण्यासाठी जात असताना आमदार अभिमन्यू पवार यांनी हा मराठय़ांचा कार्यक्रम आहे. तुम्ही पुढे बसलात तर उगाचच वाद होईल, अशी टिप्पणी केली. त्यांचे बोलणे खटकल्याने कुलकर्णी संतापल्या आणि कार्यक्रमातून निघून गेल्या.

फडणवीसांसमोरच मानापमान नाटय़
कार्यक्रम सुरू होण्यासाठी काही मिनिटे बाकी असताना नेत्यांचे आगमन होत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यासपीठावर आगमन झाले. तेव्हा इतर नेते मंचावरील खुर्च्यांवर स्थानापन्न होत होते. खासदार मेधा कुलकर्णीही मंचावर आल्या. यावेळी अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात शाब्दिक वाद झाला. जातीवरून केलेली टिप्पणी खटकल्यामुळे मेधा कुलकर्णी संतप्त झाल्या.मुख्यमंत्र्यांसमोरच पवार आणि कुलकर्णी यांच्यात मानापमान नाटय़ रंगले होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.