Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भीषण दुर्घटना! सहारा वाळवंटात ट्रक बिघडला; ८० किमी परिसरात पाणी मिळेना, ४९ जणांचा तडफडून अंत

भीषण दुर्घटना! सहारा वाळवंटात ट्रक बिघडला; ८० किमी परिसरात पाणी मिळेना, ४९ जणांचा तडफडून अंत

पश्चिम आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. आफ्रिकेतील नायजर देशात भीषण उष्णता आणि पाण्याचा थेंबही न मिळाल्यामुळे एकाच वेळी 49 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे सर्व लोक माली देशामधील मुस्लिम सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होते, मात्र वाळवंटातील हा प्रवास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला.

नेमकी घटना काय?

नायजरमधील अल्जेरिया आणि माली देशाच्या सीमेजवळ असलेल्या अस्समाका या भागापासून साधारण 80 किलोमीटर दूर, एका निर्जन आणि अत्यंत दुर्गम भागात ही घटना घडली. हे सर्व प्रवासी एका ट्रकमधून प्रवास करत होते. मात्र, ऐन वाळवंटात त्यांचा ट्रक अचानक बंद झाला. ड्रायव्हर, त्याचे साथीदार आणि प्रवाशांनी मिळून ट्रक दुरुस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही.
चहूबाजूंनी फक्त वाळू, अंगाची लाहीलाही करणारे कडक ऊन आणि सोबतीला असलेले पाणी संपल्यामुळे या प्रवाशांची अवस्था बिकट झाली. अशा भीषण परिस्थितीत मदतीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने अखेर 49 जणांचा तडफडून मृत्यू झाला. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृतदेहांची ओळख पटवून त्यांना दफनभूमीत दफन करण्यात आले आहे

या भीषण दुर्घटनेतून दोन प्रवासी कसेबसे जिवंत वाचले आहेत. त्यांनी जीव मुठीत धरून वाळवंटातील कडक उन्हात तब्बल 50 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालत पार केले. वाटेत पाणी मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचला आणि त्यांनी ‘अस्समाका’ शहरात पोहोचून अधिकाऱ्यांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
हा सहारा वाळवंटाचा भाग अनेकदा आफ्रिकन देशांमधून युरोपमध्ये बेकायदेशीरपणे जाणाऱ्या स्थलांतरितांसाठी मुख्य मार्ग मानला जातो. यापूर्वीही अनेकदा या धोकादायक मार्गावर भूक आणि तहान लागल्यामुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.