पुण्यातील गुन्हेगारीचं आणि चोरीचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढतच असल्याचं चित्र पहायला मिळत होतं. अशातच आता पोलीस हात साफ करायला लागलेत का? असा सवाल विचारला आहे. पुण्यात एका व्यापाऱ्याला गाठून 1 कोटी रुपयांची रोख रक्कम लुटल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली होती. या मोठ्या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांसमोर एक धक्कादायक चित्र समोर आले आहे. नऱ्हे परिसरात घडलेल्या या दरोड्याच्या संपूर्ण कटात चक्क खाकी वर्दीतील एका महिला कर्मचाऱ्यासह तोतया पत्रकाराचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे.
पुण्यातील एका व्यापाऱ्याची तब्बल एका कोटीची लुट करण्यात आली होती. आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या लुटीच्या घटनेनंतर आरोपी रोकड भरलेली गाडी घेऊन थेट खेड शिवापूर पोलिस चौकीत दाखल झाले होते. लुटीची गाडी घेऊन आरोपी थेट पोलिस चौकीत पोहोचल्यामुळे संशयाची मोठी सुई निर्माण झाली होती. चौकीमध्ये पोहोचल्यानंतर या रकमेतील 20 लाख रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आरोपींची मोठी धडपड सुरू झाली होती.
हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यात सगळं कैद झालं
चौकीतच सुरू असलेला हा संशयास्पद प्रकार तिथल्या काही लोकांच्या लक्षात आला. या बेकायदेशीर व्यवहाराचा प्रकार शेजारील एका हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजगडचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी तातडीने खेड शिवापूर चौकीत धाव घेतली. त्यांनी तिथून सर्व रोकड आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नऱ्हे पोलिसांच्या स्वाधीन केलं. पण यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले.
पुणे पोलिसांत खळबळ
पोलिस निरीक्षक जाधव यांनी चौकीतील प्रकाराचा गोपनीय रिपोर्ट तयार करून पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना पाठवला. या रिपोर्टनुसार आणि नऱ्हे पोलिसांच्या पुढील तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. तोतया पत्रकार आशिष तिवारी, राजगड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी प्रमिला निकम, अजीज मेस्त्री आणि इतर 2 जणांचा या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांत खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
10 जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. खेड शिवापूर आणि नरहे परिसराला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणात पुणे पोलिसांनी तोतया पत्रकार आशिष तिवारी याला अटकाव करून ताब्यात घेतलं आहे. तर महिला कर्मचारी प्रमिला निकम आणि मेस्त्री हे दोघे सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.