जळगाव : भुसावळ शहर-१ महावितरण कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वर्ग-१) नितीन अभिमन्यु पाटील (वय ४९) यांना दोन हजार रुपयांची कथित लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (दि.२२) रंगेहाथ पकडले.
या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे. एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर सोलर सिस्टीम बसविण्याची एजन्सी असून भुसावळ शहरातील दोन ग्राहकांसाठी सोलर सिस्टीम बसविण्याची मंजुरी आणि 'रिलीज ऑर्डर' मिळविण्यासाठी महावितरणकडे ऑनलाइन अर्ज करण्यात आला होता. या दोन्ही प्रस्तावांवर मंजुरी देण्याची जबाबदारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्याकडे होती.
तक्रारदाराने कार्यालयात भेट दिल्यानंतर प्रत्येक प्रस्तावासाठी एक हजार रुपये, अशा एकूण दोन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात आल्यानंतर एसीबीने सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान नितीन पाटील यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी कारवाई केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता पवार आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू मराठे यांचा समावेश होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.