नवी मुंबई : शासकीय कामासाठी लाच उकळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने कारवाईचा बडगा उगारला आहे. नवी मुंबईतील तळोजा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयातील सहायक अभियंता रोहित मोरे यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
हाती आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या 'पी. एन. इलेक्ट्रिकल' या कंपनीच्या एका कामाचा 'फिजिबिलिटी रिपोर्ट' तयार करून देण्यासाठी महावितरणचे सहायक अभियंता रोहित मोरे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. नियमात बसणाऱ्या कामासाठी लाच अधिकारी मागत असल्याने एसीबीकडे तक्रार देण्याचे तक्रारदाराने ठरवले. तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली.
एसीबीचा सापळा अन् रंगेहात अटक
तक्रारदाराच्या अर्जाची शहानिशा केल्यानंतर, नवी मुंबई एसीबीच्या पथकाने तळोजा येथील महावितरण कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून ठरलेली ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच, एसीबीने लाचेच्या रकमेसह अधिकारी रोहित मोरे यांना रंगेहात अटक केली.
अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
आरोपी सहायक अभियंता रोहित मोरे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच मोरे यांनी यापूर्वी अशा प्रकारच्या लाचखोरीच्या घटना केल्या आहेत का, याचा पुढील तपास नवी मुंबई एसीबीचे पथक करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.