🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाकी डागली! सांगलीच्या चोरट्याला सोलापुरात 'खाकी'चीच साथ; २५ लाखांच्या सोन्याच्या आमिषाने शेतकऱ्याला २८ लाखांचा गंडा, ASI निलंबित!

खाकी डागली! सांगलीच्या चोरट्याला सोलापुरात 'खाकी'चीच साथ; २५ लाखांच्या सोन्याच्या आमिषाने शेतकऱ्याला २८ लाखांचा गंडा, ASI निलंबित!


सोलापूर : बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने सांगलीतील एका तरुण शेतकऱ्याची २८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार लखन रामचंद्र ठोंबरे याला सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) अतुल सिद्रामप्पा न्यामणे (वय ५५, रा.उत्तर कसबा) याने मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फसवणुकीसाठी न्यामणे याने पोलिस ठाण्यातील शासकीय वाहनाचा वापर केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात अटक झालेल्या न्यामणे याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांचे वाहन नेणारा चालकही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. तपास अधिकाऱ्यांनी सोमवारी पाच पोलिस चालकांची चौकशी केली.

खानापूर (जि. सांगली) तालुक्यातील बलवडी-भाळवणी येथील अमर सुनील तुपे (वय ३०) यांना लखन ठोंबरे तसेच अन्य एक पुरुष व एका महिलेने स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्यावर विश्वास ठेवून तुपे यांनी जानेवारी ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत त्यांना पैसे दिले. तुपे यांनी 'यूपीआय'द्वारे ६ लाख रुपये, तर २ एप्रिल रोजी सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मागील प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर २२ लाख रुपये रोख दिले. दागिने देण्याच्या दिवशी रेल्वे स्थानकासमोरील विश्व हॉटेलजवळ ठोंबरे आणि तुपे यांची भेट झाली. मात्र, त्याचवेळी अचानक पोलिसांचे वाहन तेथे आले आणि संशयितांना ताब्यात घेऊन गेल्याचा बनाव रचण्यात आला.
हा प्रकार संशयास्पद वाटल्याने फिर्यादीने सदर बझार पोलिस ठाण्यात धाव घेतली. सध्या हा गुन्हा शहर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक मनोज मोरे तपास करीत आहेत. या प्रकरणात मुख्य सूत्रधार लखन ठोंबरे (रा. विटा, जि. सांगली), मोहन केकडे (वय ५०, रा. वैराग, ता. बार्शी) आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक अतुल न्यामणे यांना अटक करण्यात आली आहे. तर पोलिस चालकासह अन्य एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

मुख्य सूत्रधार ठोंबरेसोबत जुनी ओळख
फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लखन ठोंबरे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याची आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक न्यामणे यांची तीन वर्षांपासून ओळख असल्याचे तपासात समोर आले आहे. ठोंबरे याच्या सांगण्यावरून न्यामणे यांनी फसवणुकीच्या या गुन्ह्यात शहर पोलिसांचे शासकीय वाहन वापरल्याची बाब उघड झाली आहे. न्यामणे यांच्या सांगण्यावरून वाहन घेऊन आलेल्या पोलिस चालकाचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.