🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण Exclusive! बातमी प्रसिद्ध होताच आयुक्त झाले जागे! नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने खड्ड्यांवर फिरला जेसीबी; नागरिकांची मात्र सिमेंट रस्त्याचीच मागणी!

सांगली दर्पण Exclusive!बातमी प्रसिद्ध होताच आयुक्त झाले जागे! नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने खड्ड्यांवर फिरला जेसीबी; नागरिकांची मात्र सिमेंट रस्त्याचीच मागणी!


"सांगली दर्पणच्या बातमीने खड्डेच खड्डे चोहीकडे... गेले आयुक्त कोणीकडे?" असा थेट प्रशासनाच्या नाकावर बोट ठेवणारा सवाल विचारताच महापालिका आयुक्त अखेर झोपेतून जागे झाले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलच्या मुख्य गेटवर गेल्या काही दिवसांपासून साचलेल्या पाण्यामुळे पडलेल्या भीषण खड्ड्यांची महापालिकेने तातडीने दखल घेतली असून, आज सोमवारी सकाळीच त्या ठिकाणी मुरमाचे दोन भलेमोठे डम्पर रिकामे करून जेसीबीच्या साहाय्याने तो रस्ता समपातळीत आणण्यात आला.
​'सांगली दर्पण'ने हे वास्तव अत्यंत परखडपणे मांडल्यानंतर स्थानिक नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणी आक्रमक पाठपुरावा केला आणि प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. नगरसेवक चव्हाण यांच्या तत्परतेमुळे आणि 'सांगली दर्पण'च्या बातमीच्या प्रभावामुळे आज त्या ठिकाणी मुरूम पडून तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी हा प्रकार म्हणजे "जखम भलतीच आणि मलमपट्टी भलतीच" अशी स्थिती असल्याची टीका आता नागरिक करत आहेत.


तात्पुरती मलमपट्टी नको; कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करा!

​सिव्हिल हॉस्पिटलसारख्या अत्यंत संवेदनशील आणि सतत रहदारी असलेल्या ठिकाणी रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची आणि रुग्णवाहिकांची २४ तास वर्दळ असते. अशा ठिकाणी पडलेले खड्डे आणि साचलेले तळे म्हणजे प्रशासनाचा भयानक निष्काळजीपणाच होता.  आज पडलेला मुरूम हा केवळ तात्पुरता उपाय असून, पुढील एकाच पावसात हा सर्व मुरूम वाहून जाऊन पुन्हा चिखलाचे साम्राज्य निर्माण होणार आहे. त्यामुळे ही तात्पुरती 'मलमपट्टी' करून नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करू नका, अशी आक्रमक भूमिका परिसरातील गाळेधारक, खोकेधारक आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.

​नागरिकांची मुख्य मागणी:
"हॉस्पिटलच्या गेटसमोरील हा रस्ता तातडीने मजबूत सिमेंट काँक्रीटचा  करण्यात यावा, जेणेकरून पावसाळ्यात रुग्णांचे आणि प्रवाशांचे हाल होणार नाहीत." ​आता महापालिका प्रशासन या तात्पुरत्या मुरमावरच भागवणार की नागरिकांच्या जीविताशी खेळ न करता सिव्हिल हॉस्पिटलसमोरील रस्त्याचे कायमस्वरूपी काँक्रिटीकरण करणार, याकडे संपूर्ण सांगलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.