Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सह्याद्री एक्स्प्रेसमधील प्रवाशांची भिलवडीत लूट

सह्याद्री एक्स्प्रेसमधील प्रवाशांची भिलवडीत लूट


मिरज : कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर या जाणार्‍या व येणार्‍या सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये चोरीची व फलाटावरील महिलेचे दागिने लुटीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. भिलवडी स्थानकात दि. ४ रोजी पहाटे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. पुणे येथील छाया अजय सोनेकर या कोल्हापूर-पुणे स्पेशल एक्स्प्रेस (गाडी क्र. ०१०२४) मधून प्रवास करत होत्या. गाडी भिलवडी रेल्वे स्थानक परिसरात आली असता अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग खिडकीतून हात घालून चोरून नेली. या बॅगेमध्ये मोबाईल, चष्मा, गॉगल, घड्याळ, ब्लूटूथसह ४४ हजारांचा ऐवज होता.

तसेच शनिवारी मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास पुणे-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेसमधून उतरलेल्या एका महिला प्रवाशाला प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील अंधाराचा फायदा घेत दोन चोरट्यांनी गाठले. त्यांनी या महिलेच्या गळ्यातील सुमारे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, पाच हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल हिसकावून पलायन केले. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. एका रात्रीत सलग घडलेल्या या घटनांमुळे भिलवडी रेल्वे स्थानक आणि सह्याद्री एक्स्प्रेसमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, जाणार्‍या आणि येणार्‍या सह्याद्री एक्स्प्रेसला चोरट्यांनी लक्ष्य केल्याने प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.