राज्यातील अंशतः अनुदानित आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आता आरपारच्या लढ्याचा इशारा दिला आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाने ७ आणि ८ जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाची घोषणा केली असून, या दोन दिवसांत राज्यातील अनेक शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. हजारो शिक्षक आणि कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर धडक देणार आहेत.
सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान, वेतन सुधारणा, सेवा नियमितीकरण आणि इतर आर्थिक मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे, अशी माहिती शिक्षक समन्वय संघाचे खंडेराव जगदाळे यांनी दिली.
सरकारकडून वारंवार आश्वासने मिळूनही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने हजारो शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शिक्षक समन्वय संघाने दिला आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अंशतः अनुदानित व अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा एक-दोन दिवसांचा तोटा होईल, मात्र दीर्घकाळ न्याय मिळवण्यासाठी हा त्याग आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
दरम्यान, शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही शिक्षक समन्वय संघाने दिला आहे. या आंदोलनामुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.