भारत अमेरिकेदरम्यानच्या प्रस्तावित व्यापार कराराला विरोध करण्यासाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या किसानघाटवर किसान महापंचायतीचे आयोजन केले होते. मात्र या निषेध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेल्या हजारो शेतकऱ्यांना मंगळवारी शंभू येथील दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आले.
हरयाणा पोलिसांनी येथे बॅरीकेड आणि सिमेंट ब्लॉक लावून या शेतकऱ्यांच्या बस अडवण्यात आल्या. यादरम्यान, कुरूक्षेत्र येथे झालेल्या कारवाईत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंग चारूनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे संघटनेने सांगितले. दरम्यान, या प्रकारानंतर दिल्लीत येणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. प्रस्तावित करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान असल्याचा पंजाबसह हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश येथील शेतकरी संघटनांचा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर या राज्यातील शेतकरी या महापंचायतीच्या निषेध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने पंजाबमधील हजारो शेतकरी मंगळवारी बसमधून आपापल्या संघटनांचे झेंडे घेऊन कार्यक्रमस्थळी चालले असताना हरयाणा पोलिसांनी ही कारवाई केली. हरयाणाच्या खनौरी, शहाबाद आणि कर्नल येथील दिल्लीलगतच्या सीमांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून तेथेही शेतकऱ्यांना रोखण्यात आले आहे. दिल्लीला शांततेने जात असतानाही आम्हाला रोखण्यात आले, असे सांगताना पंजाबचे शेतकरी नेते सारवाना सिंग पांधेर यांनी राज्यातील नायब सिंग सैनी सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेवर टीका केली. यामुळे सैनी यांचा खरा चेहरा उघड झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आठ-दहा दिवसांत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चेचे आश्वासन
शेतकरी संघटनांतील कार्यकर्त्यांना सीमेवरच रोखल्यानंतर नेत्यांनी हरयाणाच्या कृषीमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी पुढील आठ ते दहा दिवसांत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी नेत्यांची भेट घडवून आणली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गुरनाम सिंग चारूनी यांनाही सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.