उत्तराखंड उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ चालकाच्या तोंडातून दारुचा वास येत असल्यामुळेच त्याने दारु पिऊन वाहन चालवले होते, असा निष्कर्ष काढता येणार नाही.
'मोटर वाहन कायदा, १९८८' अन्वये विहित केलेल्या मर्यादेपेक्षा शरीरातील मद्याचे प्रमाण अधिक होते, हे रक्त चाचणी किंवा 'ब्रेथ अॅनालायझर' चाचणीद्वारे सिद्ध होणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद केले. अशा वैज्ञानिक चाचणीच्या अभावी, केवळ दारुच्या वासाच्या आधारे मद्यपान करून वाहन चालवल्याचा किंवा बीएनएस (BNS) च्या कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करता येणार नाही.
न्यायमूर्ती आलोक मेहरा यांच्या एकल खंडपीठाने एका फौजदारी पुनरावलोकन याचिकेवर सुनावणी करताना सत्र न्यायालयाचा आदेश अंशतः रद्द केला. याचिकाकर्ता अमर सिंग हा बद्रीनाथ धाम येथून चमोलीच्या दिशेने जीप चालवत होता. गाडीवरील ताबा सुटल्याने जीप उलटली आणि त्यात अनेक प्रवासी जखमी झाले, या अपघातात एकाचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. अपघातानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत चालकाच्या तोंडातून दारुचा वास येत असल्याचे नमूद करण्यात आले होते; मात्र, यासाठी रक्ताचा नमुना आणि 'ब्रेथ अॅनालायझर' चाचणी करण्यात आली नव्हती. याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की, 'मोटर वाहन कायद्या'च्या कलम १८५ नुसार, एखाद्या व्यक्तीने मद्यपान करून वाहन चालवले होते असे तेव्हाच मानले जाऊ शकते, जेव्हा वैज्ञानिक चाचणीद्वारे हे सिद्ध होईल की त्यांच्या रक्तातील मद्याचे प्रमाण प्रति १०० मिलीलीटरमध्ये ३० मिलिग्रॅमपेक्षा जास्त होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.