🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शास्त्रज्ञांचे एकामागून एक राजीनामे; 'इस्त्रो'मधील 'या' धक्कादायक प्रकारानंतर मोदी सरकारचा थेट सर्जिकल स्ट्राईक!

शास्त्रज्ञांचे एकामागून एक राजीनामे; 'इस्त्रो'मधील 'या' धक्कादायक प्रकारानंतर मोदी सरकारचा थेट सर्जिकल स्ट्राईक!


'इस्त्रो'मधील वैज्ञानिकांच्या राजीनाम्यांबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अंतराळ क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. 14 जूलै 2026 रोजी अंतरिक्ष विभागाने महत्त्वाचा आदेश जारी करत गगनयान मोहिमेसह देशाच्या महत्त्वाच्या अंतराळ प्रकल्पांवर काम करणाऱ्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जांवर थेट निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत.

अशा सर्व प्रस्तावांची अंतिम छाननी अंतरिक्ष विभागाच्या स्तरावर केली जाणार आहे. या निर्णयामुळे इस्त्रोसमोर उभ्या राहिलेल्या मनुष्यबळाच्या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले गेले आहे. एकेकाळी देशातील सर्वोत्कृष्ट आणि प्रतिभावान तरुणांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेली ही संस्था आता अनुभवी वैज्ञानिकांच्या निर्गमनामुळे चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांत खासगी अंतराळ उद्योगाचा वेगाने विस्तार झाला आहे. अनेक खासगी कंपन्या आकर्षक वेतन, जलद पदोन्नती, आधुनिक कार्यपद्धती आणि अधिक चांगले कामकाजाचे वातावरण देत असल्याने काही वैज्ञानिक त्या दिशेने वळत आहेत. याशिवाय प्रशासकीय प्रक्रिया, निर्णय घेण्यात होणारा विलंब आणि नव्या कल्पनांना पुरेसा वाव मिळत नसल्याच्या तक्रारीही काही स्तरांवरून समोर येत आहेत.

भारताच्या गगनयान मोहिमेला विशेष महत्त्व आहे. ही देशाची पहिली मानवी अंतराळ मोहीम असून तिच्या यशासाठी अत्यंत कुशल आणि अनुभवी वैज्ञानिकांची गरज आहे. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या प्रकल्पांशी संबंधित तज्ज्ञ कर्मचारी संस्था सोडत असल्यास मोहिमांच्या गतीवर आणि गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, सरकारने खासगी क्षेत्राला अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञान विकासासाठी प्रोत्साहन दिले असले तरी इस्त्रोची भक्कम पायाभरणी कायम राहणे तितकेच आवश्यक मानले जाते. कारण अनेक खासगी उपक्रमांची उभारणी ही इस्त्रोने अनेक दशकांत विकसित केलेल्या तांत्रिक ज्ञान आणि संशोधनाच्या आधारावरच झाली आहे.

या आदेशावर तज्ज्ञांच्या मत आहे की, केवळ राजीनामे रोखून ही समस्या कायमची सुटणार नाही. वैज्ञानिकांच्या अपेक्षा, संशोधनासाठी आवश्यक सुविधा, वेतनरचना, करिअरच्या संधी आणि कार्यसंस्कृती यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. तरुण संशोधकांना अधिक जबाबदाऱ्या आणि प्रगतीची संधी दिल्यास संस्थेतील प्रतिभावान मनुष्यबळ टिकवून ठेवणे शक्य होईल.
भारताने आगामी काळात जागतिक अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी इस्त्रोला पुन्हा एकदा वैज्ञानिकांसाठी प्रेरणादायी आणि आकर्षक संस्था बनवणे ही काळाची गरज असल्याचे मानले जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.