🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"राजीनामा दिल्याशिवाय माघार नाहीच!" सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात सांगलीच्या 'झाशीच्या राणी'चा एल्गार; इंटरनेटवर धुमाकूळ!

​"राजीनामा दिल्याशिवाय माघार नाहीच!" सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात सांगलीच्या 'झाशीच्या राणी'चा एल्गार; इंटरनेटवर धुमाकूळ!


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मालन फासे या वृद्ध महिलांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या ठाम भूमिकेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा गुरुवारी १९ वा दिवस असून, मालन फासे या गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीत आंदोलनस्थळी ठाण मांडून आहेत. मुसळधार पाऊस, प्रतिकूल परिस्थिती याची पर्वा न करता आंदोलनात ठाम आहेत.

मालन फासे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न पाहून आपण आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. "मी सांगलीहून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत मी इथून जाणार नाही. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये. संकटे आली तरी कष्ट करून जगावे; पण आयुष्य संपवू नये. आई-वडिलांनी शिक्षणासाठी केलेले कष्ट वाया जाऊ देऊ नका," असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
आंदोलनादरम्यान पावसात रात्रभर उभे राहावे लागले तरी मागे हटणार नसल्याचे त्या म्हणाल्या. "धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. आता ढिलाई पडायची नाही. माघार घ्यायची नाही," असा एल्गार त्यांनी दिला. फासे यांनी यापूर्वी कधीही कोणत्याही आंदोलनात सहभाग घेतला नव्हता.

दिल्लीत आल्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या आंदोलनस्थळी पोहोचल्या. सुरुवातीला कॅमेऱ्यासमोर बोलण्याची भीती वाटत होती; मात्र आता त्या विविध माध्यमांशी संवाद साधत असून, त्यांच्या मराठमोळ्या शैलीतील वक्तव्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आंदोलनस्थळी उपस्थित नागरिक त्यांना प्रेमाने "आजी" किंवा "दादी" म्हणून हाक मारतात. अनेक जण त्यांची जेवण, चहा आणि इतर आवश्यक गोष्टींची काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जंतरमंतरवरील आंदोलन सुरूच असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.