🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- ग्रामीण आरोग्याला मोठा बूस्टर! आता थेट गावातच मिळणार छातीचा 'एक्स-रे'

सांगली :- ग्रामीण आरोग्याला मोठा बूस्टर! आता थेट गावातच मिळणार छातीचा 'एक्स-रे'


सांगली : क्षयरोग निर्मूलनाच्या मोहिमेला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, जिल्ह्यासाठी तीन ‌'हँड हेल्ड एक्स-रे मशीन‌' उपलब्ध झाल्या आहेत. या फिरत्या मशीनच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची गावोगावी जाऊन तपासणी करणे शक्य होणार आहे. विशेषतः अतिजोखमीच्या व्यक्तींच्या छातीचे एक्स-रे जागेवरच काढता येणार असल्याने क्षयरोगाचे लवकर निदान होण्यास मदत होणार आहे.

आरोग्य समितीची सभा गुरुवारी झाली. यावेळी अध्यक्षा संगीता पाटील यांच्या हस्ते ‌'हँड हेल्ड एक्स-रे मशीन‌'चे उद्घाटन झाले. यावेळी उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती ऋषिकेश लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यासाठी तीन मशीन प्राप्त झाल्या आहेत. मिरज पंचायत समितीच्या माध्यमातून मिरज, आटपाडी, खानापूर व कडेगाव तालुक्यांत या सुविधेचा वापर केला जाणार आहे. कवठेमहांकाळ पंचायत समितीअंतर्गत कवठेमहांकाळ, जत व माडग्याळ, तर शिराळा पंचायत समितीअंतर्गत शिराळा, कोकरूड, वाळवा, आष्टा व पलूस परिसरात तपासणी करण्यात येणार आहे.

जुन्या इमारतींच्या निर्लेखनाला मंजुरी
बैठकीत मिरज तालुक्यातील एरंडोली येथील उपकेंद्राची इमारत, कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगाव येथील अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाची इमारत तसेच जत तालुक्यातील तिकोंडी येथील उपकेंद्राच्या इमारतीचे निर्लेखन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. पारे (ता. खानापूर) येथील आयुर्वेदिक दवाखाना बामणी येथे स्थलांतरित करून नवीन इमारत बांधण्यास मंजुरी देण्याबाबतही चर्चा झाली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.