सांगलीत एलसीबीची मोठी कारवाई: तडीपार गुंड स्वप्निल कोलपकडून देशी बनावटीचे पिस्टल अन् जिवंत काडतूस जप्त!
सांगली :- सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका तडीपार आरोपीला बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसासह रंगेहात अटक केली आहे.
होळकर चौक परिसर येथून आरोपीला ठोकल्या बेड्या
एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकातील पोलीस हवालदार सागर लवटे, अनिल कोळेकर आणि पोलीस शिपाया विक्रम खोत यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार असलेला रेकॉर्डवरील गुंड स्वप्निल प्रकाश कोलप (वय ३६, रा. अंकली, ता. मिरज) हा होळकर चौक ते रेल्वे स्टेशन रोड परिसरात बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून थांबला आहे. मिळालेल्या बातमीच्या आधारे पथकाने तातडीने या परिसरात सापळा रचून संशयित आरोपी स्वप्निल कोलप याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले.
अंगझडतीत सापडले पिस्टल अन् काडतूस
मार्च २०२५ मध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आलेले असतानाही कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता तो सांगली हद्दीत आला होता. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीदरम्यान आरोपीच्या पॅन्टच्या डाव्या बाजूला खोचलेले १ देशी बनावटीचे पिस्टल, पॅन्टच्या खिशात १ जिवंत काडतूस आणि ४०० रुपये रोख रक्कम असा एकूण ५०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परवान्याबाबत विचारणा केली असता आरोपीकडे कोणताही कायदेशीर परवाना नव्हता.
संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी पोहेकॉ सागर लवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वरपूर पोलीस ठाणे/संजय नगर पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्निल कोलप याच्याविरुद्ध आर्म अॅक्ट (भारतीय शस्त्र अधिनियम) कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ (हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन) अन्वये गुन्हा दाखल (गु.र.नं. २५७/२०२६) करण्यात आला आहे. पुढील तपास संजय नगर पोलीस ठाणे करीत आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि प्रशांत निशाणदार, सपोफौ सुभाष सूर्यवंशी, पोहेकॉ सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, सतीश माने, दरीबा बंडगर, अमर नरळे, सागर टिंगरे, मोतीराम खोत, संदीप गुरव, उदयसिंह माळी, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, मच्छिंद्र बर्डे, विक्रम खोत व केरबा चव्हाण यांच्या पथकाने केली. जिल्ह्यात अवैध शस्त्रे आणि गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर अशीच प्रभावी व कठोर कारवाई पुढेही सुरु राहील, असा इशारा पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.