आष्टा बसस्थानकावर महिलेचे दागिने चोरणारी कोल्हापूरची सराईत गुन्हेगार जेरबंद; १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सांगलीत सापळा रचून कारवाई
सांगली :- एस. टी. बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत परजिल्ह्यातील महिला गुन्हेगाराला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. तिच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे गंठण आणि रोख रकमेसह एकूण १,४०,१८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी करण्यात आली.
काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, मिरज येथील रहिवासी फिर्यादी रोहिणी हौसेराव बल्लाळ या १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.५० ते १२.३० वाजेच्या सुमारास आष्टा एस. टी. बसस्टँडवर बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन एका चोरट्याने त्यांच्या बॅगमधील पर्समधून सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी १६ जुलै २०२६ रोजी आष्टा पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०३ (२) अंतर्गत (गुन्हा नोंद क्र. १८०/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला होता.सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांतील संशयितांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तैनात केले होते. पथक सांगली परिसरात गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार ऋषिकेश सदामते व विनायक सनदी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत महिला गुन्हेगार कामिना चौगुले ही चोरीचे सोन्याचे दागिने विकण्यासाठी सांगली बसस्थानक परिसरात येणार आहे. या बातमीच्या आधारे पथकाने सांगली बसस्थानक परिसरात निगराणी सुरू केली. दरम्यान, 'कृष्णा बंगल्या'च्या भिंतीजवळ एक महिला संशयितरीत्या थांबलेली दिसून आली. पथकातील महिला पोलीस अंमलदार सपना गराडे व सुनिता शेजाळे यांच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आले.
चोरीची कबुली आणि मुद्देमाल जप्त
चौकशीदरम्यान तिने आपले नाव कामिना प्रकाश चौगुले (वय ३९, रा. बेघर वसाहत, शाहूनगर, कागल, जि. कोल्हापूर) असे सांगितले. महिला पोलिसांमार्फत पंचांसमक्ष तिची अंगझडती घेतली असता, तिच्या हातातील पिशवीतील रुमालामध्ये १० ग्रॅम वजनाचे काळया मण्यातील सोन्याचे गंठण (किंमत १,४०,०००/- रु.) आणि १८०/- रुपयांची रोख रक्कम आढळून आली.
अधिक चौकशी केली असता, तिने १५ दिवसांपूर्वी आष्टा बसस्टँडवर बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या बॅगमधून हे सोन्याचे गंठण चोरल्याची कबुली दिली. आष्टा पोलीस ठाण्यातील अभिलेख तपासला असता या चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार
पकडण्यात आलेली महिला आरोपी कामिना चौगुले ही पोलिसांच्या दप्तरावरील सराईत गुन्हेगार असून तिच्यावर यापूर्वीही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी महिला आणि जप्त केलेला १,४०,१८० रुपयांचा मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी आष्टा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे.ही कामगिरी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक सपना गराडे, पोलीस अंमलदार संदीप पाटील, अतुल माने, संदीप गुरव, सुनिता शेजाळे, ऋषिकेश सदामते, विनायक सनदी, अभिजीत माळकर, संकेत कानडे, गणेश शिंदे, महेश कुंभार, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आणि सांगली सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.