मिरजेत एम.एस.ई.बी. ऑपरेटरच्या खुनाचा ५ तासांत उलगडा; महात्मा गांधी चौक पोलिसांची धडक कारवाई, २ संशयित जेरबंद!
मिरज येथील कृपामाई एम.एस.ई.बी. सबस्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या ऑपरेटरचा डोक्यात व चेहऱ्यावर लोखंडी बारने वार करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या पाच तासांत छडा लावत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने दोन संशयित आरोपींना थरारक पाठलाग करून पहाटेच्या सुमारास जेरबंद केले.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ जुलै २०२६ रोजी रात्री ८:१० ते ८:३५ च्या सुमारास मिरज येथील कृपामाई एम.एस.ई.बी. सबस्टेशनमधील ऑपरेटर रुममध्ये सुधीर पंडित लाटवडे (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांच्यावर अज्ञात इसमाने डोक्यात व चेहऱ्यावर प्राणघातक हत्याराने वार करून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी मेस्को सुरक्षा रक्षक रामकृष्ण गणपती तोडकर (वय ४२, रा. इसापूरे हॉस्पिटल मागे, मिरज) यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २६४/२०२६) दाखल करण्यात आला.
किरकोळ वादातून खुनाचा थरार
पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून गोपनीय माहिती संकलित केली असता धक्कादायक माहिती समोर आली. संशयित आरोपी सौरभ निकम याचे वडील संतोष निकम हे कृपामाई सबस्टेशन येथे मेस्को कंपनीतर्फे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. २९ जुलैच्या सायंकाळी ऑपरेटर सुधीर लाटवडे आणि संतोष निकम यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून सौरभ निकम याने आपल्या साथीदारासह सबस्टेशनमध्ये जाऊन सुधीर लाटवडे यांच्यावर लोखंडी बारने वार करून त्यांचा जीव घेतला.
अटक करण्यात आलेले संशयित आरोपी:
१) सौरभ संतोष निकम (वय २३, रा. एम.एस.ई.बी. रोड, बेडग, ता. मिरज, जि. सांगली)
२) विनायक विक्रम सावंत (वय २२, रा. दुधगाव रोड, बागणी, ता. वाळवा, जि. सांगली)
पाच तासांत पोलिसांची चमकदार कामगिरी
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी डी.बी. पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. संशयितांची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मागोवा घेतला. फिर्यादी पोलीस ठाण्यात आल्यापासून अवघ्या ५ तासांच्या आत दि. ३० जुलै रोजी पहाटे संशयितांचा थरारक पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.सदर उल्लेखनीय कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपाली गायकवाड, श्रेणी पी.एस.आय. सुदर्शन वाघमोडे, पोलीस अंमलदार अभिजित धनगर, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, इब्राहिम तांबोळी, संतोष डामसे, नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसीन टिनमेकर, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, विकास कांबळे, विजय शिंदे, अजितसिंह कोळेकर, चालक सुधीर खोंद्रे, पांडुरंग हिप्परकर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे आणि विजय पाटणकर यांच्या पथकाने केली. शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत तात्काळ पोलीस प्रशासनास माहिती द्यावी, असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.