🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सीसीटीव्हीचा पहारा, २४ तासांची गजबज... अन् औषधाच्या दुकानात ६ फुटी अजगर! आष्ट्यात तस्करी की व्यावसायिक वैमनस्य?

सीसीटीव्हीचा पहारा, २४ तासांची गजबज... अन् औषधाच्या दुकानात ६ फुटी अजगर! आष्ट्यात तस्करी की व्यावसायिक वैमनस्य?


आष्टा :- येथील एका गजबजलेल्या आणि २४ तास सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असलेल्या औषधाच्या दुकानात तब्बल पाच ते सहा फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आजवर आष्टा शहर व परिसरात कधीही अजगर आढळल्याची नोंद नसताना, थेट औषधाच्या दुकानातील खोक्यात अजगर सापडल्याने अनेक संशयास्पद प्रश्न उपस्थित होत आहेत. या गंभीर घटनेचा वन विभाग आणि पोलिसांनी सर्व बाजूंनी तातडीने तपास करावा, अशी तीव्र मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

कर्मचाऱ्यांची पळापळ, ग्राहकांना काढले बाहेर
दोन दिवसांपूर्वी दुकानातील कामगार औषधांची खोकी हाताळत असताना अचानक हा ५ ते ६ फुटी अजगर दृष्टीस पडला. अजगराला पाहताच भीतीपोटी कर्मचाऱ्यांची चांगलीच गाळण उडाली. जीवाच्या आकांताने कर्मचाऱ्यांनी थेट काऊंटरवरून उड्या मारत बाहेर पळ काढला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दुकानदाराने तातडीने ग्राहकांना बाहेर काढत दुकान बंद केले आणि सर्पमित्राला पाचारण करून अजगराला सुखरूप बाहेर काढले.
प्रकार दडपण्याचा प्रयत्न का?

एवढी मोठी घटना घडून दोन दिवस उलटले तरी दुकानमालक आणि कर्मचाऱ्यांनी यावर मौन बाळगल्याने संशय अधिक गडद झाला आहे. दुकानात अजगर सापडल्याची बातमी पसरल्यास 'धंदा ठप्प होईल' या भीतीने हा गंभीर प्रकार दडपण्याचा प्रयत्न झाल्याची जोरदार चर्चा आता शहरात सुरू आहे.

तीन मोठे संशय अन् शक्यता:
१. तस्करीचे धागेदोर: परिसरात वन्यजिवांची छुप्या मार्गाने तस्करी सुरू असून, या तस्करांचे कनेक्शन औषध वाहतूक किंवा दुकानाशी जोडलेले असावे?

२. व्यावसायिक पूर्ववैमनस्य: दुकान सुरू होण्यापूर्वी मोठा वाद झाला होता. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेतून किंवा पूर्ववैमनस्यातून कोणी खोडसाळपणा म्हणून दुकानात अजगर सोडला का?

३. वाहतुकीतून प्रवेश: बाहेरून आलेल्या औषधांच्या बॉक्समध्ये आधीपासूनच बसलेला हा अजगर 
वाहतुकीदरम्यान दुकानात पोहोचला असावा?

​कासव तस्करीत ५ लाखांची खंडणी... आता 'अजगर कांड'! काही वर्षांपूर्वी आष्ट्यातील एका बिअरबारमधील पाण्याच्या हौदात तस्करीच्या उद्देशाने कासवे पाळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या प्रकरणात बार मालकाकडे तब्बल ५ लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता थेट औषधाच्या दुकानात अजगर सापडल्याने शहरात जुन्या तस्करीच्या आठवणी ताज्या झाल्या असून, यामागे मोठे रॅकेट आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.