🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली


पुणे : गुन्ह्याच्या तपासासाठी साताऱ्यात गेलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस उपनिरीक्षकासह तिघा कर्मचाऱ्यांनी तपासाऐवजी पर्यटन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेत अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी संबंधित तिघांचीही दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याचा आदेश दिला आहे.

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दाखल एका गुन्ह्याच्या तपासासाठी संबंधित महिला पोलिस उपनिरीक्षकासह तिघेजण चार एप्रिल रोजी तक्रारदार महिलेसह साताऱ्याला गेले होते. नियमानुसार स्थानिक पोलिसांची मदत घेऊन तपास करणे गरजेचे असताना त्यांनी तसे केले नाही. तसेच घटनास्थळी तपास न करता ते कास पठार आणि इतर पर्यटनस्थळे पाहण्यात दंग झाले. तक्रारदार महिलेची आई आजारी असल्याने तिने लवकर घरी सोडण्याची विनंती केली; मात्र पोलिसांनी तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. 

रात्री पुण्यात परतल्यानंतर तक्रारदार महिलेला मध्यरात्री स्वारगेट व नंतर नारायण पेठ चौकीत सोडून पोलिस निघून गेले. वास्तविक फिर्यादी महिला असल्याने त्यांना घरी सोडणे आवश्यक असताना तसे न केल्याने कर्तव्यात कसुरी केली. या त्रासाला कंटाळून महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवली. चौकशीत निष्काळजीपणा सिद्ध झाल्याने अतिरिक्त पोलिस आयुक्त बनसोडे यांनी ही कारवाई केली.

'संबंधित पोलिसांनी तपासाच्या नावाखाली केवळ मौजमजा केली. तक्रारदाराला सोबत नेऊनही गुन्ह्याचा तपास न करता बेशिस्त वर्तन केले. अशा कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन होत असून, हा गंभीर बेजबाबदारपणा आहे,' असा ठपका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात ठेवला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.