महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने राज्यभरात ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता 'उत्सव हॉल', १०० फूट रोड, सांगली येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजप महिला मोर्चाने दिली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबवला जात आहे. महिला शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात अधिक सक्षम, स्वावलंबी आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि आकर्षणे:
मोफत 'कृषी माऊली' किट वितरण:
या सोहळ्यात सांगली जिल्ह्यातील १०० गरजू व कष्टकरी महिला शेतकऱ्यांना प्रगत भाजीपाला बियाणे, जैविक खते, खुरपे, विळा आणि आधुनिक स्प्रेअर यांसारख्या अत्यंत उपयुक्त साहित्यांचा समावेश असलेले 'कृषी माऊली किट' मोफत वितरित केले जाईल. (या योजनेअंतर्गत राज्यभरात एकूण ४ हजार महिला शेतकऱ्यांना हे किट वितरित केले जाणार आहे.)
माती परीक्षणाचे थेट प्रात्यक्षिक:
शेतीतील उत्पादन खर्च कमी करून जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी माती परीक्षण अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्र (KVK), तालुका कृषी अधिकारी (TAO) आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत मातीचा नमुना कसा घ्यावा, जमिनीची सुपीकता कशी ओळखावी आणि खतांचे योग्य नियोजन कसे करावे, याचे थेट प्रात्यक्षिक महिला शेतकऱ्यांना दाखवले जाणार आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन:
आधुनिक शेतीतील नवीन प्रयोग, पीक संरक्षण आणि सेंद्रिय शेती या विषयांवर कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. "महिला शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करणे, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून त्यांची उत्पादनक्षमता वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे हाच या सोहळ्याचा मुख्य केंद्रबिंदू आहे."
भाजप महिला मोर्चा महिला शेतकरी भगिनींना उपस्थित राहण्याचे आवाहन:
या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाला सांगली शहर व परिसरातील महिला शेतकरी भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या योजनेचा आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्वातीताई खाडे आणि जिल्हा प्रभारी सौ. मंजिरीताई गाडगीळ यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.