🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांना शस्त्र सक्ती; विश्वास नांगरे पाटलांचे थेट आदेश"

"सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांना शस्त्र सक्ती; विश्वास नांगरे पाटलांचे थेट आदेश"


नागपूर : शहरातील वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध चौकांमध्ये नाकाबंदी, विशेष तपासणी मोहीम तसेच वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी आता ड्युटीदरम्यान 'सर्व्हिस गन' बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याबाबतचे आदेश गुरुवारी (ता.१६) वॉकी-टॉकीद्वारे देण्यात आले. शहरात नाकाबंदीवेळी गुन्हेगार, संशयित आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना अनेकदा प्रतिकार, धक्काबुक्की किंवा जिवाला धोका निर्माण होण्याच्या घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांना संरक्षण मिळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देता यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्तांनी वाहतूक शाखेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ड्युटीदरम्यान 'नीट अँड क्लीन' राहण्याचे निर्देश दिले होते. स्वच्छ गणवेश, शिस्तबद्ध वर्तन आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण संवाद यावर विशेष भर देण्यास सांगितले होते. आता त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने 'सर्व्हिस गन' बाळगण्याचा निर्णय झाल्याने वाहतूक शाखेच्या कामकाजात आणखी शिस्त आणि सज्जता येणार असल्याचे मानले जात आहे. शहरातील प्रमुख चौक, नाकाबंदी आणि विशेष बंदोबस्तादरम्यान या आदेशाची तातडीने अंमलबजावणी केली जाणार असून, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

एसीपी, डीसीपींनाही 'गन' बाळगण्याचे आदेश

आज वाहतूक पोलिसांना 'सर्व्हिस रिव्हॉल्व्हर' ठेवण्याचे आदेश दिले असताना, दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांनी शहरातील सर्वच पोलिस आयुक्त, साहाय्यक पोलिस आयुक्त आणि सर्वच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनाही 'सर्व्हिस रिव्हॉल्व्हर' ठेवण्याचे आदेश दिले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पोलिसांवर हल्ले वाढले आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तांनी हे आदेश काढले असल्याचे समजते.

शहरात दररोज ५२० वाहतूक पोलिस रस्त्यावर
नागपूर शहरात प्रत्यक्ष रस्त्यावर सुमारे ५२० वाहतूक पोलिस गस्त, वाहतूक नियंत्रण आणि अंमलबजावणीसाठी उपलब्ध असतात. शहरातील मंजूर पदसंख्या ८४३ असली तरी साप्ताहिक सुट्ट्या, रजा, वैद्यकीय कारणे, बंदोबस्त आणि व्हीआयपी ड्युटीमुळे दररोज प्रत्यक्ष रस्त्यावर तैनात असलेली संख्या सुमारे ५२० पर्यंत मर्यादित राहते. शहरात २० लाखांहून अधिक वाहने आणि १७१ सिग्नलयुक्त चौक आहेत, हे विशेष.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.