🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

IAS मुंढे ऑन ॲक्शन मोड! धाड पडताच गुटखा फॅक्टरीत खळबळ, मालक पळाला पण कॅमेऱ्यात कैद झालं काळं कृत्य!

IAS मुंढे ऑन ॲक्शन मोड! धाड पडताच गुटखा फॅक्टरीत खळबळ, मालक पळाला पण कॅमेऱ्यात कैद झालं काळं कृत्य!


राज्यात 2012 पासून गुटखाबंदी लागू असली तरी अनेक ठिकाणी गुटखा सहज उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशातच अकोल्यातील एमआयडीसी परिसरात चक्क गुटखा तयार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत गुटखा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे साहित्य, पॅकिंगसाठी लागणारी लेबले, सुपारी, तंबाखू तसेच पॅकिंग मशीन असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत सुमारे 50 लाख रुपये असण्याची शक्यता असून त्याची मोजणी अद्याप सुरू आहे.
दोन दिवस संबंधित ठिकाणी पाळत ठेवली अन् मोठी कारवाई

या कारवाईबाबत माहिती देताना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी बेकायदेशीर कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर दोन दिवस संबंधित ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. अधिकारी संख्या कमी असल्यामुळे वाशिम आणि अमरावती येथील अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. सकाळी साडेनऊच्या सुमारास छापा टाकण्यात आला असता कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. त्या वेळी तीन कामगार प्रत्यक्ष काम करत होते. चौकशीदरम्यान त्यांनी हा संपूर्ण कारभार गौरव शर्मा नावाचा व्यक्ती चालवत असल्याचे सांगितले. घटनास्थळी गुटखा तयार करण्यासाठी वापरले जाणारे यंत्रसामग्री, कच्चा माल आणि पॅकिंग साहित्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले.

संबंधित गोदामाच्या मालकालाही आरोपी करण्यात येणार
या प्रकरणात घटनास्थळी सापडलेल्या तीन जणांविरुद्ध कारवाई करण्यात येत असून गौरव शर्मा याला आरोपी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित गोदामाच्या मालकालाही आरोपी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या कारखान्यातील उत्पादन किती दिवसांपासून सुरू होते, याबाबत सध्या निश्चित माहिती देता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येणार असून त्यातून आणखी आरोपींचा सहभाग समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तंबाखूजन्य पदार्थ, अवैध गुटखाविरोधात कारवाईचा वेग वाढल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत अकोल्यातच गुटखा तयार करणारा कारखाना सुरू असल्याचे उघड झाल्याने ही कारवाई विशेष महत्त्वाची मानली जात आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार असला तरी कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली असून संपूर्ण रॅकेटचा तपास आता पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून केला जाणार आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या कारखान्यातून तयार होणारा गुटखा कुठे पुरवला जात होता, याचा तपास पुढील चौकशीत केला जाणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.