छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पोलीस उपायुक्त कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत असलेल्या एका ग्रेड पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित विवाहित ही एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. तो मागील काही वर्षांपासून तिचं वारंवार लैंगिक शोषण करत होता. या प्रकरणी पीडितेनं आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पोलीस अधिकारी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. हरीश माधवराव खटावकर (वय ५३) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ग्रेड पीएसआयचे नाव आहे.
हॉटेलचे काम आणि घराच्या इंटेरियरचे बहाणे
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हरीश खटावकर यांची गेल्या ४ वर्षांपासून ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत खटावकर याने मे २०२५ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीनं हॉटेलमध्ये काम असल्याचं सांगून तसेच घराचे इंटेरियर दाखवण्याच्या बहाण्याने पीडितेला घरी बोलवून लैंगिक शोषण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पीडितेने या गोष्टीला नकार दिला असता, आरोपीनं तिच्या पतीला सांगून बदनामी करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला.
पतीने जाब विचारताच केला मोठा राडा, कारमध्ये मारहाण
हा प्रकार उघडकीस येण्यामागे खटावकर याच्या काही संशयास्पद हालचाली कारणीभूत ठरल्या. खटावकर हा पीडितेच्या मोबाईलवर मेसेज करत असल्याची माहिती तिच्या पतीला मिळाली. पतीने या संदर्भात खटावकरला फोन करून जाब विचारला असता, "माझे तिच्यावर प्रेम आहे," असं थेट उत्तर देऊन खटावकर याने फोन कट केला, असंही फिर्यादीत म्हटलं आहे.यानंतर बुधवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास खटावकर थेट पीडितेच्या घरी पोहोचला. तिथे पतीने पीडितेला घराबाहेर काढलं असता, खटावकर याने तिला बळजबरीने कारमध्ये बसवलं. सय्यद निसार नावाचा व्यक्ती ही कार चालवत होता. कार चालत असताना खटावकर याने पीडितेला बेदम मारहाण केली. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास तिचा मोबाईल हिसकावून घेत, तिला शहरातील दूध डेअरी चौकात उतरवून तो पसार झाला, असंही तक्रारीत म्हटलं आहे.
११ वर्षांपूर्वीही झाली होती निलंबनाची कारवाई
दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी हरीश खटावकर हा १९९३ साली पोलीस दलात भरती झाला होता. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये काम केल्यानंतर सध्या तो परिमंडळ २ कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत आहे. खटावकरचा या पूर्वीचा इतिहासही वादग्रस्त राहिला आहे. ११ वर्षांपूर्वी एका पीडितेशी अश्लील आणि वाईट वर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती.
गुन्हा दाखल होताच आरोपी पसार, सीपींकडे अहवाल सादर
आता ताज्या प्रकरणात खटावकर यांच्यावर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी हरीश खटावकर फरार झाला आहे. उपायुक्त कार्यालयाने या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल पोलीस आयुक्त (CP) प्रवीण पवार यांच्याकडे पाठवला असून, आरोपीवर लवकरच कडक कायदेशीर आणि खात्यांतर्गत कारवाई केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.