🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​शाळेच्या संचालकाच्या पत्नीचे ड्रायव्हरसोबत 'अनैतिक संबंध'; पतीचा काटा काढण्यासाठी बेडवर सोडला विषारी साप!

शाळेच्या संचालकाच्या पत्नीचे ड्रायव्हरसोबत 'अनैतिक संबंध'; पतीचा काटा काढण्यासाठी बेडवर सोडला विषारी साप!


साप चावल्याने झालेल्या एका तरुणाच्या मृत्यूचे प्रकरण पोलीस तपासात धक्कादायक वळणावर पोहोचले आहे. सुरुवातीला हा मृत्यू साप चावल्यामुळे झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तपासादरम्यान हा अपघाती मृत्यू नसून नियोजनबद्ध हत्या असल्याचे पोलिसांनी उघड केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत अतुल पंवार यांचा खून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केल्याचं समोर आलंय. अतुल यांची पत्नी दामिनी हिने तिचा कथित प्रियकर तुषार उर्फ निक्की आणि आणखी दोघांच्या मदतीने पतीला संपवण्यासाठी विषारी सापाचा वापर केला. या हत्येमागे 20 लाख रुपयांच्या विम्याची रक्कम आणि प्रेमसंबंध हे कारण असल्याचे तपासात समोर आले आहे.
अनैतिक संबंधातून नवऱ्याला संपवलं, 20 लाखांच्या इन्सुरन्सवर डोळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडोरा गावातील 35 वर्षीय अतुल पंवार आणि त्याची पत्नी दामिनी हे हस्तिनापूरमधील रामलीला मैदान परिसरात कृष्णा किड्स पब्लिक स्कूल चालवत होते. दोघांनी 2019 मध्ये प्रेमविवाह केला होता. शुक्रवारी सकाळी दामिनी हिने पतीला साप चावल्याची माहिती देत त्याला हस्तिनापूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी अतुलच्या बेडमध्ये सापही आढळल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान दामिनीच्या मोबाईलची कॉल डिटेल आणि तांत्रिक पुराव्यांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये शाळेचा ड्रायव्हर तुषार उर्फ निक्की याच्याशी तिचा सतत संपर्क असल्याचे समोर आले. चौकशीत तुषारने दामिनीसोबत प्रेमसंबंध असल्याचे आणि दोघांनी मिळून अतुलच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुधातून झोपेच्या गोळ्या दिल्या, अन् नंतर विषारी साप सोडला
पोलिसांच्या तपासानुसार, गुरुवारी रात्री अतुलला दुधामध्ये झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस देण्यात आला. त्यामुळे तो गाढ झोपेत गेल्यानंतर तुषारने सोनू आणि उदय यांच्या मदतीने विषारी साप खोलीत आणून अतुलच्या अंगावरील ब्लँकेटमध्ये सोडला. त्यानंतर सापाने अतुलला चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. तपासात अतुलच्या नावावर सुमारे 20 लाख रुपयांचा विमा असल्याचेही समोर आले. विम्याची रक्कम मिळाल्यानंतर या कटात मदत करणाऱ्या सोनू आणि उदय यांना पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. याशिवाय सुमारे 20 दिवसांपूर्वी तुषारने अतुलला अर्टिगा कारने धडक देऊन ठार मारण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी अतुलने हेल्मेट घातले असल्यामुळे तो बचावला होता.

या प्रकरणाचा उलगडा करताना मेरठचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अविनाश पांडे यांनी सांगितले की, अतुल पंवार यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी कुटुंबीयांनी, विशेषतः पत्नीने, साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले होते. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती आणि सापाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तांत्रिक तपास सुरू करण्यात आला. मोबाईलमधील पुरावे, तांत्रिक सर्व्हिलन्स आणि चौकशीदरम्यान आरोपींच्या मोबाईलमध्ये डब्यात ठेवलेल्या सापाचा फोटोही आढळला. त्यानंतर तुषारने दोन साप पकडणाऱ्यांकडून हा साप विकत घेतल्याचे सांगितले. दामिनीने पतीचा खून करून विम्याचे पैसे मिळवण्याचा आणि त्यानंतर तुषारने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन दामिनीसोबत विवाह करण्याचा कट रचल्याचेही तपासात समोर आले आहे. पोलिसांनी जप्त केलेला साप तपासणीसाठी पाठवला असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मेरठच्या हस्तिनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.