फक्त 12 हजार पगार, पण बँक बॅलन्स पाहून कुणाचेही डोळे चक्रावतील. तीन महिलांनी क्लासरूममध्ये केलेल्या काळ्या कारनाम्यांमुळे शिक्षकी पेशालाच काळिमा फासला आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील वडाकरा एमडीएमए प्रकरणाला खळबळजनक वळण लागलं आहे.
पोलिसांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणाच्या आरोपात 3 महिला शिक्षिकांना अटक केली आहे. या तिन्ही महिला जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या पेराम्बरा नावाच्या छोट्या शहरात काम करत होत्या. या महिला शिक्षिका ब्लॉक रिसोर्स सेंटरच्या होत्या ज्या समग्र शिक्षा केरळच्या अंतर्गत काम करतात. डिस्ट्रिक्ट ऍन्टी नारकोटिक्स स्पेशल ऍक्शन फोर्सने ही कारवाई केली आहे.
या महिला शिक्षिका सिंथेटिक ड्रग्जसाठी मध्यस्थाचं काम करायच्या. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शिक्षिका कस्टमर शोधायच्या, यानंतर पैशांची देवाणघेवाण होऊन ड्रग्ज सप्लाय केला जायचा, असं पोलिसांनी सांगितलं आहे. गृहखात्याच्या ऑपरेशन तुफान अंतर्गत स्पेशल इनव्हेस्टिगेशन टीम याप्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होऊ शकते, असं संकेत पोलिसांनी दिले आहेत.
पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. वडाकरामध्ये राहणाऱ्या सफवान याला 26 जूनला एडीएमएसोबत अटक करण्यात आली होती. त्याची चौकशी सुरू असताना पोलिसांना क्युआर कोड आणि बँक खात्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. यानंतर 11 जुलैला फिजिकल एज्युकेशन इन्स्ट्रक्टर के.सी.कीर्तनाला अटक केली गेली. कीर्तनाच्या बँक खात्यामध्येही पैसे ट्रान्सफर केल्याचे पुरावे मिळाले.
यानंतर 26 जुलैला स्पेशल एज्युकेटर के.काव्याला पोलिसांनी अटक केली. काव्या ऑटिजम पीडित मुलांना शिकवायची. तिच्या बँक खात्यातूनही या नेटवर्कला पैसे पाठवले गेले होते. पोलिसांनी 28 जुलैला ट्रेनर व्ही.पी.नीष्मालाही अटक केली. त्याच दिवशी कन्नूर जिल्ह्यातील डिलिव्हरी वर्कर जिजिल कुरियाकोसलाही पोलिसांनी पकडलं. जिजिल पैशांची देवाणघेवाण आणि ड्रग्जची डिलिव्हरी करायचा.
कमी पगार असूनही खात्यात लाखो रुपये
या महिला शिक्षिकांचा पगार 12 ते 13 हजार रुपये होता, तरी त्यांच्या खात्यांमध्ये लाखो रुपये आढळून आले. या बँक खात्यांचा वापर मोठ्या ड्रग्ज नेटवर्कसाठी केला गेल्याचा संशय पोलिसांना आहे. या महिला शिक्षिकांना ड्रग्ज डीलच्या बदल्यात मोठं कमिशन मिळायचं, तसंच या महिलांचं लाईफस्टाईलही लॅव्हिश होतं. या महिला शिक्षिका झुंबा क्लासही घ्यायच्या. सुरूवातीला स्वत: शिक्षिकांनी ड्रग्ज घ्यायला सुरूवात केली, पण जेव्हा त्यांना ही ड्रग्ज विकत घेता आली नाहीत तेव्हा त्या ड्रग्ज एजंट बनल्या.
शिक्षिकांनी जाळ्यात ओढलं
या महिला शिक्षिका असल्यामुळे सुरूवातीला मुलांचा वापर या नेटवर्कमध्ये झाल्याची भीती निर्माण झाली होती, पण पोलीस तपासात शाळेतल्या मुलांचा ड्रग्ज नेटवर्कसाठी वापर झाल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. या काळ्या धंद्यात आणखी काही शिक्षकांना फसवण्याचा प्रयत्न झाला होता, पण याचा तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
चलाखीने चालवलं ड्रग्ज रॅकेट
या महिला शिक्षकांनी चलाखीने त्यांचं रॅकेट चालू ठेवलं होतं. शिक्षिका असल्याचा फायदा तिघींनी उचलला, त्यामुळे त्यांच्यावर कुणालाच संशय आला नाही. आरोपींनी झुंबा क्लास आणि बन विक्रीला आपल्या ड्रग्ज धंद्याचं मेन कव्हर बनवलं होतं. फूड डिलिव्हरी ऍपसाठी काम करणाऱ्या एजंटच्या अटकेमुळे महिला शिक्षिकांचं बिंग फुटलं. एमडीएमए ला बंगळुरूवरून कोझिकोडला आणण्यात आलं, आरोपींनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या बंगळुरू ट्रिपचे व्हिडिओही शेअर केले. महिला शिक्षिका कस्टमर्सना आखाती देशांमधल्या एका फोन नंबरशी संपर्क करायला सांगायच्या. डिजिटल पेमेंट मिळाल्यानंतर कस्टमरला एक लोकेशन पाठवलं जायचं, या लोकेशनवर जाऊन कस्टमरना स्वत: तिथे ठेवलेली ड्रग्ज उचलावी लागायची. या कामात डिलिव्हरी वर्कर त्यांची पूर्ण मदत करायचा.
शिक्षण विभाग अलर्ट मोडवर
या संपूर्ण प्रकरणानंतर शिक्षण विभाग अलर्ट मोडवर आला आहे. शिक्षण विभागाच्या स्टेट प्रोजेक्ट डायरेक्ट्रेटने कीर्तना आणि काव्याला कामावरून ताढून टाकलं आहे. तर नीष्माला बरखास्त करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. तसंच सर्व जिल्हा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर्सना स्पेशल एज्युकेटर आणि शिक्षकांची बैठक बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टरने एक सर्क्युलरही जारी केलं आहे, ज्यात सर्व बीआरसी कोऑर्डिनेटर्सना स्पेशल एज्युकेटरच्या कामावर खास नजर ठेवायला सांगण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.