🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी: १८ हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार; लेखी परीक्षा ९० गुणांची!

सांगली जिल्हा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी: १८ हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार; लेखी परीक्षा ९० गुणांची!


सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुप्रतीक्षित नोकर भरतीला उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कनिष्ठ लिपिकाच्या ४४४ पदांसाठी तब्बल १८ हजार ९२४ अर्ज दाखल झाले अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लेखी परीक्षेच्या तारखेकडे लागले आहे.

जिल्हा बँकेतील कनिष्ठ लिपिक पदांची भरती प्रक्रिया 'आयबीपीएस' या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी २४ जूनपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत होते. एकूण पदांपैकी ७० टक्के जागा सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी, तर उर्वरित ३० टक्के जागा इतर जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एका जागेसाठी ४२ वर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

भरती प्रक्रियेदरम्यान आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी शासनाकडे आक्षेप नोंदवत भरतीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली होती; मात्र जिल्हा बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने स्थगिती उठविली. त्यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी बँकेने अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढविली होती. अखेर शुक्रवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली. 

भरतीच्या पुढील टप्प्यात लेखी परीक्षा होणार असून, या परीक्षेला ९० गुण, तर मुलाखतीला १० गुण असणार आहेत. मुलाखतीतील पाच गुण शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि पाच गुण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दिले जाणार आहेत. लेखी परीक्षेसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अकोला आणि बीड येथे परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता हजारो उमेदवारांना परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा लागली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.