🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मी FDA अधिकारी आहे' दुकानमालकाला सांगताच तो थरथर कापायला लागला; दुकान सील करण्याची धमकी, ६ लाख उकळले अन्.

'मी FDA अधिकारी आहे' दुकानमालकाला सांगताच तो थरथर कापायला लागला; दुकान सील करण्याची धमकी, ६ लाख उकळले अन्.


मुंबई: महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त आयएएस तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर सातत्याने धाडसत्र सुरू केले आहे. त्यामुळे अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि स्वीट मार्ट चालकांमध्ये एफडीएच्या तपासणीबाबत भीतीचे वातावरण आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत काही भामट्यांनी वसईतील एका व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 23 जून रोजी काही स्त्री-पुरुष वसईतील एका नामांकित स्वीट मार्टमध्ये गेले. त्यांनी स्वतःची ओळख एफडीएचे वरिष्ठ अधिकारी अशी करून दिली आणि दुकानाची तपासणी करण्यास सुरुवात केली. तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांमध्ये त्रुटी असल्याचा दावा करत दुकान सील करण्याची, गुन्हा दाखल करण्याची आणि माध्यमांमध्ये बदनामी करण्याची धमकी त्यांनी दुकानमालकाला दिली.

या धमक्यांमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाकडे आरोपींनी सुरुवातीला 12 लाख रुपयांची मागणी केली. अखेर वाटाघाटीनंतर 6 लाख रुपयांवर तडजोड झाली आणि दुकानमालकाने आरोपींना रोख रक्कम दिली. आरोपी निघून गेल्यानंतर संबंधित व्यक्ती सरकारी अधिकारी नसल्याचा संशय आल्याने दुकानमालकाने चौकशी केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी या प्रकरणी विजय जाधव, स्वाती तुळसकर, स्वाती राठोड आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध फसवणूक, खंडणी उकळणे आणि बनावट सरकारी अधिकारी असल्याचे भासविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान या टोळीने यापूर्वी मुंबईतील काही व्यापाऱ्यांनाही अशाच प्रकारे लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी कोणतीही तपासणी करणारी व्यक्ती आल्यास तिची अधिकृत ओळखपत्रे आणि नियुक्तीची खात्री करूनच सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.