सांगली :- मणेराजुरी (ता. तासगाव) येथील प्रसिद्ध 'महालक्ष्मी ज्वेलर्स' या सोन्या-चांदीच्या दुकानाचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाला अवघ्या चार दिवसांत यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून २ किलो ७३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ६,९२,०८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राहुल दादासो जमदाडे (वय २९, रा. रामलिंग शाळेजवळ, मणेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल विलास कदम (रा. कुमठे, ता. तासगाव) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
नेमकी घटना काय?
दिनांक ८ जुलै ते ९ जुलै २०२६ च्या दरम्यान रात्रीच्या सुमारास मणेराजुरी गावातील महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचा कडी-कोयडा अज्ञात चोरट्याने पक्कडच्या सहाय्याने तोडला होता. दुकानात प्रवेश करून चोरट्याने चांदीचे दागिने लंपास केले होते. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुरनं. ३१०/२०२६ बी.एन.एस कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी एका विशेष पथकाची स्थापना केली होती.दिनांक १३ जुलै २०२६ रोजी एलसीबीच्या पथकातील पोलीस अंमलदार सागर टिंगरे, दरिबा बंडगर आणि सुनील जाधव यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. यशवंतनगर ते वसंतदादा कारखान्याकडे जाणाऱ्या रोडवरील मदनभाऊ पाटील बालउद्यानाजवळ एक इसम पाठीवर सॅक अडकवून चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने या परिसरात कडक निगराणी ठेवली. यावेळी तिथे मोटारसायकलसह संशयास्पदरित्या थांबलेल्या राहुल जमदाडे याला पथकाने वेढा घालून जागीच ताब्यात घेतले.
पोलीसी खाक्या दाखवताच दिली कबुली:
संशयित राहुल जमदाडे याच्या सॅकची पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने आढळून आले. दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी करताच, त्याने चार दिवसांपूर्वी मणेराजुरीतील महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान पक्कडच्या सहाय्याने तोडून ही चोरी केल्याची कबुली दिली.
७ लाखांचा मुद्देमाल जप्त:
पोलिसांनी आरोपीकडून ६,३२,०३० रुपये किमतीचे २ किलो ७३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (ज्यामध्ये पैंजण, करदोडा, ब्रेसलेट, छल्ला, गणपतीची मूर्ती, बिंदल्या, अंगठी, बिच्छावा, जोडवी, बांगडी, मासुळी, लिंग, मेखला, तोडे वाळे यांचा समावेश आहे), ६० हजार रुपयांची एचएफ डिलक्स मोटारसायकल आणि ५० रुपयांची पक्कड असा एकूण ६,९२,०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोहेकॉ सागर टिंगरे, दरिबा बंडगर, अतुल माने, सतीश माने, अनिल कोळेकर, नागेश खरात, सागर लवटे, प्रकाश पाटील, मोतीराम खोत, संदीप गुरव, संदीप नलावडे, अमर नरळे, तसेच पोकों सुनील जाधव, विक्रम खोत, महेश कुंभार, गणेश शिंदे, सुशांत चिले आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोकों विजय पाटणकर व कॅप्टन गुंडवाडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.