सांगली दर्पण Exclusive! सांगलीत 'FDA'चा डोळेझाकपणा की महा-अर्थपूर्ण शांतता? संपूर्ण महाराष्ट्रात धडक कारवाया, मग सांगलीतच 'ऑल वेल'चा आव का?
हॉटेल, दूधवाले, मेडिकल अन् तेल माफिया मोकाट; सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना अभय कोणाचे?
सांगली: संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कंबर कसली असून, भेसळखोर आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांवर धाडींचे सत्र सुरू आहे. मात्र, या कारवाईच्या झंझावातात सांगली जिल्हा जणू काही 'अपवाद' ठरताना दिसत आहे. जिल्ह्यात केवळ 'तूरळक' आणि दिखाऊ कारवाया करून प्रशासन हात झटकत असल्याने सांगलीकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोट्यवधी रुपयांचा बनावट माल जप्त होत असताना, सांगलीत मात्र हॉटेल्स, दूध डेअरी, मेडिकल स्टोअर्स, खाद्यतेल विक्रेते आणि गल्लोगल्ली लागणाऱ्या हातगाड्यांवर सगळं काही 'आलबेल' आणि 'नियमबद्ध' सुरू असल्याचा आव आणला जात आहे. "सांगलीत खरंच सगळेच प्रामाणिक आहेत, की तपास यंत्रणांनी डोळ्यांवर 'अर्थपूर्ण' पट्टी बांधली आहे?" असा जळजळीत सवाल आता सामान्य जनता विचारत आहे.
मोठ्या 'माशांना' अभय, छोट्यांवरच केवळ कारवाईचे नाटक?
जिल्ह्यात खाद्यतेलात होणारी भेसळ, दुधातील घातक पावडरींचे मिश्रण, हॉटेलमधील अस्वच्छता आणि उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असूनही सांगलीच्या FDA विभागाकडून आजपर्यंत एकही 'धक्कादायक' किंवा मोठी कारवाई का झाली नाही?
दूध आणि अन्नपदार्थ थेट आरोग्यावर घाला: जिल्ह्यात रोज हजारो लिटर दूध आणि अन्नपदार्थांची विक्री होते. यामध्ये कोणतीही भेसळ नाही का?औषध दुकानांची तपासणी कागदावरच? अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये नियमबाह्य औषध विक्रीच्या तक्रारी असूनही मोठी कारवाई शून्य आहे.
हातगाड्यांवर दूषित अन्नाचा सुळसुळाट: संध्याकाळच्या वेळी चौकाचौकात लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कोणत्या दर्जाचे तेल आणि साहित्य वापरले जाते, याची साधी तपासणी करण्याची तसदीही अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. "महाराष्ट्रात धाडींवर धाडी पडत असताना सांगलीचा FDA विभाग कुणाच्या आशीर्वादाने सुस्त पडला आहे? सांगलीकरांना शुद्ध अन्न आणि औषधे मिळण्याचा अधिकार नाही का?"
— संतप्त सांगलीकर नागरिक
सांगलीकरांचा सवाल: 'कारवाईचा 'टोल' की ' हप्तेशाहीचा 'झोल'?
जिल्ह्यातील या संशयास्पद शांततेमुळे आता थेट प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नावाला एखादी किरकोळ कारवाई करायची आणि मोठ्या प्रकरणांकडे कानाडोळा करायचा, हा पॅटर्न सांगलीत कधी थांबणार? नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रॅकेटला प्रशासनातील अधिकाऱ्यांचे अभय आहे का, अशी शंका घेण्यास आता वाव निर्माण झाला आहे.FDA च्या या सुस्त आणि निष्क्रीय कारभारामुळे सांगलीकरांचे आरोग्य मात्र रामभरोसे चालले आहे. वरिष्ठांनी आता तरी या प्रकारात लक्ष घालून सांगलीतील संशयास्पद शांततेचा बुरखा फाडावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, हीच जनतेची मागणी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.