Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राम मंदिरानंतर बद्रीनाथ धाममध्येही होतेय देणगी चोरी? मंदिर प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

राम मंदिरानंतर बद्रीनाथ धाममध्येही होतेय देणगी चोरी? मंदिर प्रशासनाकडून चौकशीचे आदेश


उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिराच्या देणगीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत असतानाच, आता उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ धाममधूनही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. बद्रीनाथ मंदिरातील भाविकांच्या दानामध्ये अफरातफर होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) शुक्रवारी तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

सोशल मीडियावरील दाव्यानंतर मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये
बद्रीनाथ धाममधील दान चोरीच्या संदर्भातील काही पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे (BKTC) अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी तत्काळ पावले उचलली. त्यांनी सांगितले की, "सोशल मीडियावर फिरत असलेल्या आरोपांची मंदिर समितीने गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे." यासोबतच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागवण्यात आलं आहे.
वैयक्तिक सचिवाबाबतच्या दाव्याचे अध्यक्षांकडून खंडन

या प्रकरणाला सोशल मीडियावर वेगळं वळण देण्याचा प्रयत्न झाला. चोरीचा आरोप असलेल्या एका विशिष्ट कर्मचाऱ्याचा संबंध थेट मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांच्याशी जोडण्यात आला आणि तो कर्मचारी अध्यक्षांचा 'वैयक्तिक सचिव' असल्याचा दावा केला गेला.

अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांचे स्पष्टीकरण
"सोशल मीडियावर केला जाणारा हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे. ज्या कर्मचाऱ्याचे नाव घेतले जात आहे, तो माझा कोणताही वैयक्तिक सचिव नाही. तो बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचा (BKTC) एक नियमित सरकारी कर्मचारी आहे." अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या आरोपांनंतर देशभरातील हिंदू भाविकांमध्ये आधीच संतापाचं वातावरण आहे. त्यातच आता चारधामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ धामचे नाव अशा वादात आल्यामुळे भाविकांच्या श्रद्धेला मोठा धक्का बसला आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर नेमकं काय समोर येतंय, राम मंदिराप्रमाणे बद्रीनाथ मंदिरातही चोरी झाली का? यात कुणाचा सहभाग आहे, हे स्पष्ट होईल. सध्या या प्रकरणाने उत्तराखंडच्या राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.