सांगली : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने मंगळवारी सायंकाळी विशेष मोहीम राबवण्यात आली. सायंकाळी ६:०० ते ७:३० या वेळेत कर्मवीर चौक परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.
भर पावसातही पोलिसांनी वाहन तपासणी केली. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत १०९ केसेस दाखल करण्यात आल्या. ७६ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यामध्ये परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) जवळ न बाळगणाऱ्या ५१ वाहनचालकांवर केसेस करून ३२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या ३२ वाहनांवर कारवाई करत २३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. नियम तोडून ट्रिपल सीट जाणाऱ्या १५ दुचाकी चालकांवर केसेस करून १५ हजार रुपये दंड करण्यात आला.याशिवाय, कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या ३ वाहनांवर ३ हजार रुपये, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या २ चालकांवर २ हजार रुपये आणि कारला काळी फिल्म (ब्लॅक फिल्म) लावणाऱ्या २ वाहनांवर २ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणखी ४ केसेसही या वेळी दाखल करण्यात आल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.