दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनात फेकलेले दगड थेट तुमच्या आधार कार्डशी लिंक होऊ शकतात, असं कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? पण राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी चक्क असाच एक अजब दावा केला आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतरही दिल्लीतील राजकीय वातावरण शांत झालेले नाही. आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अद्याप मागे न घेतल्याने ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली पोलिसांच्या ‘ॲडव्हान्स’ तपासाचा दाखला देत विरोधकांवर पलटवार केला आहे.
दगडावरील फूटप्रिंट्स थेट आधारशी लिंक?
चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांच्या तपासाची एक धक्कादायक माहिती दिली. “जंतरमंतर परिसरात पडलेला प्रत्येक दगड पोलिसांनी उचलला आहे. त्या दगडांवर असणारे फूटप्रिंट्स (ठशे) थेट आधारशी लिंक केले जातील,” असा अत्यंत अजब दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पोलिसांनी आपल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही आकडेवारी गोळा केली असून, आता राहुल गांधींनाही आपले आरोप सिद्ध करावे लागतील, असे आव्हान त्यांनी दिले.“लोकशाहीची हीच सुंदरता आहे की तुम्ही कुणावरही आरोप करू शकता. राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी आरोप केले म्हणजे ते सत्य ठरत नाही,” असं पाटील यांनी ठणकावून सांगितलं. जंतरमंतरवर पकडण्यात आलेले आंदोलक कोणकोणत्या गुन्ह्यांत सामील होते, याचं संपूर्ण विश्लेषण पोलिसांनी केलं आहे. हा रिपोर्ट पाहिला तर भल्याभल्यांना चक्कर येईल, असा इशाराही त्यांनी दिला.दुसरीकडे, अभिजीत दीपके यांना येणाऱ्या धमक्यांवरही त्यांनी भाष्य केले. धमकी देणारा व्यक्ती भाजपचाच आहे, हे कशावरून? एखादा काँग्रेसचा कार्यकर्ताही भाजपच्या नावाने फोनवरून धमकी देऊ शकतो, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. दीपके यांनी केवळ आरोप न करता पोलिसांत रीतसर तक्रार करावी किंवा न्यायालयात दाद मागावी, असा थेट सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.