तासगाव: तासगाव नगरपालिकेच्या शाळांमधील वीज बिलाचा प्रश्न अखेर रस्त्यावर आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने शुक्रवारी ‘भीक मागो’ आंदोलन करत पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा आरोप करत, शाळांना अंधारात ठेवणाऱ्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेत्या सुशीला जाधव यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना जाधव यांनी पालिका प्रशासनावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मुख्याध्यापकांना स्वतःच्या पगारातून शाळांचे वीज बिल भरावे लागत आहे. आतापर्यंत ही रक्कम तब्बल २ लाख २५ हजार रुपयांवर पोहोचली असून, प्रशासनाने अद्याप एक रुपयाही परत दिलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
शहरातील पालिका शाळांचे दरमहा ४० ते ५० हजार रुपयांचे वीज बिल थकले असून, अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तासगाव येथील क्रमांक १४ शाळेचे केवळ १,६५० रुपयांचे मीटर बिल न भरल्याने वीज तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही त्यांनी उघड केला.
केवळ वीज बिलाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण पालिका शिक्षण व्यवस्थाच ढासळल्याचा आरोप करत जाधव म्हणाल्या, अनेक शाळांच्या इमारती गळक्या आहेत, कंपाऊंड भिंती नाहीत, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. कंत्राटी शिक्षकांची संख्या घटल्यामुळे एका शिक्षकावर अनेक वर्गांचा भार पडत आहे. पेटकर प्लॉट परिसरातील शाळेत तर जागेअभावी लहान विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे पालिका शाळांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेली ही खेळवणूक थांबवण्यासाठी आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही ‘भीक मागो’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून, जमा झालेल्या निधीतून शाळांची थकीत वीज बिले भरण्याचा निर्णय घेतल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक रामचंद्र माळी, अभिषेक देशिंगकर, अरुण साळुंखे, पूनम माळी, सचिन कांबळे, अहमदनगर, ज्योती कोळी, उषा कांबळे, शोभा जाधव, अमृता माळी, तुकाराम कुंभार, माजी नगरसेवक बाळासो सावंत, युवा नेते स्वप्निल जाधव, खंडू कदम आदी उपस्थित होते.
आंदोलनातून केलेल्या प्रमुख मागण्या
पालिका शाळांची थकीत वीज बिले तातडीने अदा करावीत.मुख्याध्यापकांनी स्वतःच्या पगारातून भरलेल्या २.२५ लाख रुपयांची त्वरित परतफेड करावी.खंडित झालेला वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा.गळक्या इमारती, स्वच्छतागृहे व कंपाऊंड भिंतींची तातडीने दुरुस्ती करावी.रिक्त शिक्षक पदे भरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर करावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.