लोकहिताच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा - खासदार विशाल पाटील- दिशा समिती बैठकीत विविध विकासकामांचा घेतला आढावा
सांगली : केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांतर्गत शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवावी व जास्तीत जास्त लाभार्थींना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत. लोकहिताच्या प्रश्नांवर शासकीय यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी आज येथे दिल्या.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. तसेच वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, रेल्वे सुरक्षा, वन्यप्राण्यांचा उपद्रव, घरकुल योजना, रस्ते, गॅस पुरवठा आदी लोकहिताच्या विषयांवर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील वाडी-वस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळेत होणाऱ्या भारनियमनाबाबत चर्चा झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन भारनियमनाची पद्धत पुनर्विचारात घेण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच वीजपुरवठ्याचे नियोजन सर्व भागांमध्ये समतोल पद्धतीने करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.
आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी वसगडे येथील रेल्वे आंदोलनानंतर दाखल झालेल्या प्रकरणांबाबत व रेल्वे पुलाच्या परिसरातील दुरुस्तीची कामे, चिंचणी, शिवाजीनगर व हिंगणवाड येथील पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक वीजपुरवठ्याबाबत, आमदार सत्यजीत देशमुख यांनी वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत प्रभावी उपाययोजना करण्याबाबत, आमदार सुहास बाबर यांनी पशुधनासाठी मिनरल मिक्स्चर योजनेला अधिक निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच घरकुल योजनांसाठी वाळू अथवा पर्यायी कृत्रिम वाळू उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी या बैठकीत दिलेल्या सूचनांवर संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी दिल्या.
बैठकीत रेल्वे सुरक्षेसंदर्भात आवश्यक खबरदारी घेणे, सिग्नल यंत्रणेशी छेडछाड होऊ नये यासाठी दक्षता वाढविणे, हजारवाडी गॅस प्रकल्पासंदर्भातील प्रलंबित विषय निकाली काढणे, आयर्विन पुलास समांतर पुलावरून एसटी बस वाहतूक सुरू करण्याच्या शक्यतेची तपासणी करणे, पीएनजी गॅस जोडणी प्रक्रियेत नागरिकांकडून अनधिकृत आर्थिक मागणी होणार नाही याची दक्षता घेणे तसेच मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज रोडसंदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी संयुक्त बैठक घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यावेळी खासदार विशाल पाटील यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यासह जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक, कृषि, समाजकल्याण, वैद्यकीय महाविद्यालय मिरज, महिला व बाल विकास आदि विविध विभागांकडील योजनांचा आढावा घेतला. प्रारंभी ग्रामीण विकास विभागाच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बैठकीस लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.