रस्ते की भंगार डेपो? सांगली-मिरज-कुपवाडमध्ये बेवारस वाहनांचा उच्छाद; महापालिका आणि वाहतूक पोलीस कधी ॲक्शन मोडमध्ये येणार?
सांगली :-सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांतील मुख्य रस्ते आणि अंतर्गत चौक सध्या वाहतुकीसाठी कमी आणि भंगार वाहने उभी करण्यासाठीच जास्त वापरात येत आहेत की काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. परभणी महापालिकेने शहर वाहतूक शाखेसोबत संयुक्त मोहीम आखून बेवारस वाहने जप्त करण्याचा धडक निर्णय घेतला असताना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आणि स्थानिक वाहतूक शाखा मात्र या गंभीर समस्येकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर, गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये आणि गल्लीबोळांत वर्षानुवर्षे शेकडो जुनाट, नादुरुस्त आणि बेवारस वाहने उभी आहेत. ही वाहने केवळ वाहतुकीस अडथळा ठरत नसून, शहराच्या विद्रुपीकरणाला आणि अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.
अपघातांना आमंत्रण अन् गुन्हेगारांचे अड्डे!
रस्त्यांच्या कडेला पडून असलेल्या या वाहनांमुळे आधीच अरुंद झालेले रस्ते अधिकच लहान झाले आहेत. यामुळे शहरात दररोज वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्ताप वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी या धूळ खात पडलेल्या वाहनांच्या आडोशाने रात्रीच्या वेळी मद्यपी आणि टवाळखोरांचे अड्डे जमत असल्याच्या तक्रारी महिला व नागरिकांकडून होत आहेत. यापूर्वी अशा बेवारस वाहनांमुळे लहान-मोठे अपघात घडले आहेत, मात्र तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही.
परभणीचा पॅटर्न सांगलीत कधी राबवणार?
परभणी महापालिकेने अशा वाहनांमुळे अपघात घडल्यास थेट वाहन मालकांवर जबाबदारी निश्चित केली असून, वाहने जप्त करून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. सांगली-मिरज-कुपवाड शहरातही वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अशाच आक्रमक कारवाईची गरज आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे, गर्दीच्या ठिकाणी पोलीस चौक्या उभारणे आणि रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे आता अनिवार्य झाले आहे.
नागरिकांचा सवाल: महापालिका कारवाईचा 'मुहूर्त' कधी काढणार?
प्रशासनाने तात्काळ शहरातील अशा बेवारस वाहनांचे सर्वेक्षण करून त्यांच्या मालकांना नोटिसा बजावाव्यात. मुदतीत वाहने न हटवल्यास ती जप्त करून थेट महापालिकेच्या गोदामात जमा करावीत, अशी मागणी जोर धरत आहे. महापालिका आणि वाहतूक पोलीस केवळ कागदी घोडे नाचवणार की परभणीप्रमाणे संयुक्त कारवाई करून रस्ते मोकळे करणार, याकडे आता सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.
अल्टिमेटम द्या, नाहीतर वाहने जप्त करा!
"सार्वजनिक रस्ते ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही. वर्षानुवर्षे रस्त्यावर पडून असलेली भंगार वाहने उचलून महापालिकेने शहर मोकळे श्वास घेईल असे करावे. प्रशासनाने आळस झटकून रस्त्यावरील हे 'भंगार साम्राज्य' तात्काळ साफ करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल."
— संतप्त नागरिक, सांगली-मिरज-कुपवाड.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.