🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"हिंसाचाराने प्रश्न सुटत नाहीत..."; विद्यार्थी आंदोलनावर सलमान खानने मौन सोडलं, सरकारवर व्यक्त केला विश्वास

​"हिंसाचाराने प्रश्न सुटत नाहीत..."; विद्यार्थी आंदोलनावर सलमान खानने मौन सोडलं, सरकारवर व्यक्त केला विश्वास


राजधानी दिल्लीत  सुरू झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं  आता देशाच्या विविध भागांत पसरली आहेत. केवळ दिल्लीतच नव्हे, तर अनेक शहरांमधील विद्यार्थी निदर्शनं करत आहेत आणि रॅलींचे आयोजन करत आहेत.

अनेक सेलिब्रिटी आणि सिनेसृष्टीतील व्यक्ती 'कॉकरोच जनता पार्टी'च्या  आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि निदर्शकांवरील पोलीस कारवाईच्या विरोधात आवाज उठवत आहेत. दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसक संघर्ष होऊन एक दिवस उलटल्यानंतर, अनेक अभिनेते आणि गायकांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून सरकारलाही चर्चा करण्याचं, संवाद साधण्याचं आवाहन केलंय. 

दरम्यान, सलमान खान  आणि शाहरुख खान  यांसारख्या बड्या बॉलिवूड  स्टार्सच्या मौनाबाबत बरीच चर्चा रंगली होती. अगदी कपूर कुटुंबीयांनीही  यावर पूर्णपणे मौन बाळगलंय. मात्र, अखेरीस बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान यानं एक निवेदन जारी केलंय. सलमान खाननं एक ट्वीट  करत विद्यार्थ्यांना आपला पाठींबा जाहीर केलाय.


सलमान खान नेमकं काय म्हणाला? 
सलमान खान ट्वीट करत म्हणाला की, "ही एक अत्यंत शांततापूर्ण चळवळ होती; तिला हिंसक वळण लागले याचे खूप दुःख वाटते. ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुखापत झाली, त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती वाटते. प्रश्नपत्रिका फुटणे (पेपर लीक) ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. आपल्या देशातील मुले एका चांगल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत आणि त्यांच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, हे पाहून मला खूप आनंद होत आहे."
हे आंदोलन किंवा हा विरोध हीच योग्य पद्धत : सलमान खान 

"त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून कौतुक करतो. त्यांनी दाखवलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करून स्वतःचे भविष्य घडवण्याची तसेच एक महान आणि सुशिक्षित भारत निर्माण करण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. हे आंदोलन किंवा हा विरोध हीच योग्य पद्धत आहे आणि विद्यार्थ्यांनी ते अत्यंत शांततेने केले आहे. ते खरोखरच धैर्यवान आणि शूर आहेत. शिक्षणाप्रती समर्पित आणि प्रेरित असलेली ही पिढी भारताचा नक्कीच गौरव वाढवेल...", असं सलमान खान म्हणाला.

याचं राजकारण केलं जाऊ नये... : सलमान खान 

पुढे बोलताना सलमान खान म्हणाला की, "हा मुद्दा विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्था यांच्यातील आहे, याचं राजकारण केलं जाऊ नये. याचे संपूर्ण श्रेय आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच दिलं पाहिजे. मला खात्री आहे की, सरकारही त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक बळकट करेल. ही सर्वांसाठीच फायदेशीर अशी स्थिती आहे. सकारात्मक निर्णयाची आशा आणि प्रार्थना करतो. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तुम्हा सर्वांवर ईश्वराची कृपा असो..."

शिक्षण हीच पुढची 'ट्रेंड' आणि 'फॅशन' बनली पाहिजे : सलमान खान
"शिक्षण हीच पुढची 'ट्रेंड' आणि 'फॅशन' बनली पाहिजे आणि ती दरवर्षी अधिक लोकप्रिय आणि आकर्षक झाली पाहिजे; इतकी की परदेशातून लोक शिक्षणासाठी भारतात येतील आणि भारत एक 'एज्युकेशनल हब' (शिक्षणाचे प्रमुख केंद्र) बनेल...", असं सलमान खान म्हणालाय. दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून मोठा पाठींबा मिळतोय. राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटीही विद्यार्थ्यांसाठी आणि देशाच्या भविष्यासाठी मैदानात उतरले आहेत. 

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते प्रकाश राज,अतुल कुलकर्णी यांसारखे अनेक कलाकार आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जंतर-मंतरवर पोहोचलेले. तर, नसरुद्दीन शाह, सोनाक्षी सिन्हा, हृतिक रोशन यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टमधून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवला होता. तर, यावर बॉलिवूडच्या तीन खान्सकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. तर कपूर कुटुंबीयांकडूनही या प्रकरणात मौन बाळगलेलं. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. अशातच आता बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खाननं यावर आपली भूमिका स्पष्ट केली असतानाच, आता नेटकऱ्यांकडून शाहरुख खानंही आपली भूमिका जाहीर करावी असा सूर आवळला जातोय.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.